पत्नी आणि गर्भवती प्रेयसीचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 07:03 PM2020-03-02T19:03:59+5:302020-03-02T19:12:14+5:30
अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
अंबाजोगाई : अल्पवयीन मुलीसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पत्नीचा खून करून पतीने नंतर गर्भवती प्रेयसीचाही खून केला होता. चार वर्षापूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा शिवारात हे हत्याकांड घडले होते. याप्रकरणी सोमवारी अंबाजोगाई विशेष जिल्हा व सत्र न्या. एम.बी. पटवारी यांनी आरोपी पतीस पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून आजन्म जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येल्डा शिवारात वकिलाची डाग नामक शेतात दिलीप हनुमंत खोडवे आणि त्याची पत्नी प्रीती (वय २१) हे दोघे राहत होते. दिलीप खोडवे जनावरे चारण्यासाठी दररोज शेताच्या बाजूच्या डोंगरावर जात असे. त्याच ठिकाणी जनावरे चारण्यासाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत फूस लाऊन दिलीपने तिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती अल्पवयीन पीडिता गर्भवती राहिली. याची कुणकुण दिलीपच्या पत्नीला लागली होती आणि दिलीपसाठी ती अनैतिक संबंधातील अडसर ठरू लागली होती. त्यामुळे दि. ४ ऑक्टोबर 2016 रोजीच्या रात्रीतून दिलीपने स्वतःच्या घरात पत्नीचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर शेतात लिंबाच्या झाडाखाली गर्भवती प्रेयसीचाही गळा आवळला.
दोघींचा खून केल्यानंतर दिलीपने स्वतःही विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दि. ५ ऑक्टोबर 2016रोजी पहाटेच्या सुमारास या प्रकरणास वाचा फुटली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ गिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक लाटकर, पीएसआय कांबळे, पोलिस कर्मचारी नागरगोजे, डापकर, डोंगरे आणि राऊत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन दिलीप खोडवे यास रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर दिलीप ठणठणीत बरा झाला.
दरम्यान, अल्पवयीन पिडीतेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दिलीपवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात कलम ३०२, ३७६(अ), ३०९, पोक्सो आणि ॲट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी हरी बालाजी आणि विशाल आनंद यांनी सखोल तपास करून याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यांना तपासात हे.कॉ. कांगणे यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई विशेष जिल्हा व सत्र न्या. एम.बी. पटवारी यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूंनी साक्षी पुरावे होऊन १६ साक्षीदार तपासल्यानंतर न्या. पटवारी यांनी आरोपी दिलीप खोडवे यास पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरविले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दिलीपने अल्पवयीन पिडीतेचा खून केल्याचा आरोप मात्र न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही. याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहा. सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी आणि फिर्यादीचे वकील ॲड. विलास लोखंडे यांनी कामकाज पहिले. त्यांना ॲड. नितीन पुजदेकर, पैरवी अधिकारी गोविंद कदम, पो.कॉ. बी.एस.सोडगीर, महिला पोलीस कर्मचारी शीतल घुगे यांची मदत झाली.