मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर; ५० टक्के खरीप क्षेत्र पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 04:20 PM2021-09-30T16:20:36+5:302021-09-30T16:21:09+5:30
२२ लाख हेक्टरवरून आता ३० लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद : मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. खरीप हंगामातील ५० टक्के पीकक्षेत्राचा चिखल झाल्याची प्राथमिक माहिती असून अंदाजे सात ते आठ हजार कोटी रुपये मदतीसाठी लागण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे मराठवाडा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी बुधवारी चर्चा केली. विभागीय पातळीवर सर्व जिल्ह्यांतून नुकसान आणि संभाव्य लागणाऱ्या मदतीचा आढावा घेतला जात आहे. २२ लाख हेक्टरवरून आता ३० लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सोयाबीन वाळून काढणीवर आले आहे. सतत पावसामुळे बहुतांश ठिकाणचे सोयाबीन काढलेले नसल्यामुळे ५० टक्के उत्पादनावर परिणाम होणार आहे. कपाशीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादनाला फटका बसला आहे. तीन वर्षांपासून कपाशीला अतिवृष्टीचा फटका बसत आहे. काही प्रमाणात कडधान्यांची पिकेदेखील अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. १५० टक्के पाऊस हा जास्तच आहे. ५० लाख हेक्टर पेरण्यांच्या तुलनेत ५० टक्के खरीप हंगाम बाधित होण्याचा अंदाज आहे. २८ सप्टेंबरपर्यंत लातूर व उस्मानाबाद जिल्हे नुकसानीच्या यादीत नव्हते. परंतु २८ रोजी झालेल्या पावसामुळे या जिल्ह्यातही नुकसान झाले आहे. अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांना विभागीय पातळीवरून देण्यात आली.
सुपीक जमिनीवर अतिवृष्टीचा घाला; मराठवाड्यात ७ हजार हेक्टर जमीन गेली वाहून
विमा कंपन्यांची बैठक घेणार
सध्या प्रशासकीय यंत्रणा मदत व पुनर्वसनाचा आढावा घेत आहे. विमा कंपन्यांची काही जिल्ह्यांमध्ये अडचण नाही. काही जिल्ह्यांत अडचण आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आढावा घेऊन एक बैठक विभागीय पातळीवर घेण्याचे आदेश आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत.
औरंगाबाद - जिल्ह्यातील निर्माण पूरपरिस्थितीमध्ये स्थानिक बचाव पथकाने २४ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले असून अतिरिक्त मदतीसाठी एनडीआरएफचे एक पथक रवाना केले आहे. उस्मानाबाद - जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, कळंब तालुक्यातील दहा महसुली मंडळे प्रभावित झाली आहेत. जिल्ह्यामध्ये मांजरा नदीवरील धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. धरणाच्या खालील वाकी व वाक्केवाडी गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन नागरिक अडकले होते. सौंदनाआंबा, कळंब येथे दहा जणांना व उस्मानाबाद गाव दाऊतपूर येथे सहा जणांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.लातूर- पोहरेगाव तालुका रेणापूर येथे अडकलेल्या तीन व्यक्तींच्या बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहे.
मराठवाड्यात न भूतो न भविष्यती पाऊस; ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
हेलिकॉप्टर, बोटींनी सुमारे १०० जणांना वाचविले
एनडीआरएफ जवानांनी तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेने उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, यवतमाळ भागातील सुमारे १०० जण वाचविले. उस्मानाबादमधून १६ जणांना हेलिकॉप्टरने तर २० जणांना बोटीद्वारे वाचविले. लातूरमध्ये ३ जणांना हेलिकॉप्टरमधून तर ४७ जणांना बोटीतून वाचविले. औरंगाबादमधून अनुक्रमे २ आणि २४ जणांना वाचविण्यात यश मिळाले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांना विभागीय पातळीवरून देण्यात आली.