'पदवीधर'साठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार उतरले मैदानात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 05:55 PM2020-11-22T17:55:26+5:302020-11-22T17:59:01+5:30
महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांसाठी मराठवाड्यात करणार ६ दिवसांचा झंझावाती दौरा
औरंगाबाद : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ आजपासून वैजापूर येथून झंझावती दौऱ्याला सुरुवात केली आहे. सहा दिवसांच्या दौऱ्यात ते आख्खा मराठवाडा पिंजून काढणार आहेत.
येत्या १ डिसेंबर रोजी मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत महाविकास आघाडिचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. रविवारपासून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रचारासाठी झंझावाती दौरा सुरु करून मतदारांना मतदानासाठी आवाहन केले. रविवारी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात संपर्क अभियानावर भर दिला. यावेळी मतदारांनी त्यांना उदंड प्रतिसाद दिला.
सोमवारी औरंगाबाद काढणार पिंजून.....
मराठवाडा पदवीधर संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांच्या प्रचारार्थ राज्यमंत्री अब्दुल सत्तार सोमवारी औरंगाबाद येथील माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर वाळुज येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, एमजीएम महाविद्यालय, नवखंडा महाविद्यालय, फोस्टर डेव्हलपमेंट महाविद्यालय, एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय सर्व महाविद्यालयांतील मतदारांशी भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
चार दिवसात सात जिल्ह्यात करणार प्रचार.....
महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांच्या प्रचारार्थ राज्यमंत्री अब्दुल सत्तार मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील झंझावाती दौरा करणार आहे. त्यात मंगळवारी (ता. २४) जालना जिल्ह्यात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह प्रचार दौरा करणार आहेत. बुधवारी (ता. २५) सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची नॅशनल एज्युकेशन सोसायटी येथे बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवारी (ता. २६) उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.तर शुक्रवारी (ता. २७) राज्यमंत्री अब्दुल सत्तार नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
प्रमुख लोकप्रतिनिधी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती .....
राज्यमंत्री अब्दुल सत्तार या दौऱ्याच्या दरम्यान महाविकस आघाडीतील सर्व घटक पक्षांचे खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष , तालुकाध्य्क्ष, प्रमुख पदाधिकारी, संस्थाचालक, पदवीधर मतदार संघाचे मतदार यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करणार आहेत.
विदर्भातही करणार दोन दिवसीय दौरा.....
राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे मराठवाड्याप्रमाणे विदर्भातही २८ आणि २९ नोव्हेंबर ला दौरा करणार आहेत. या दौऱ्या दरम्यान अमरावती शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार तर नागपूर पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित गोविंदराव वंजारी यांचा प्रचार करणार आहेत.