सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर भावाने केला अत्याचार; प्रसूतीदरम्यान विधवेचा बनाव उघडकीस आल्याने वाचा फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 11:33 AM2021-08-30T11:33:14+5:302021-08-30T11:50:43+5:30
Crime News पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाच कुटुंबात राहणाऱ्या ३३ वर्षीय भावाने अल्पवयीन बहिणीला जून २०२० मध्ये सुरुवातीला स्पर्श करीत विनयभंग केला. त्यानंतर काही दिवसांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
औरंगाबाद : सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका १५ वर्ष ११ महिने वयाच्या अल्पवयीन बहिणीवर ३३ वर्षाच्या भावाने सहा महिने सतत अत्याचार केला. यातून बहिणीला दिवस गेले. सात महिने झाल्यानंतर बहिणीने भावाला प्रेग्नंट असल्याचे सांगितले. या अल्पवयीन पीडितेने २५ ऑगस्ट रोजी खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. रुग्णालयाने मुलीचे आधारकार्ड मागितल्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडितेच्या तक्रारीवरून भावाच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Brother raped minor sister in Aurangabad)
सिटी चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाच कुटुंबात राहणाऱ्या ३३ वर्षीय भावाने अल्पवयीन बहिणीला जून २०२० मध्ये सुरुवातीला स्पर्श करीत विनयभंग केला. त्यानंतर काही दिवसांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तेव्हा घरात कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अत्याचाराचा प्रकार सतत सुरू होता. यातून अल्पवयीन पीडितेला गर्भधारणा झाली. सात महिने झाल्यानंतर पीडितेने भावाला प्रेग्नंट असल्याचे सांगितले. यावरून भावाने पीडितेला बाळ माझे आहे हे, आई-वडिलांना सांगू नकोस, नाहीतर मारून टाकीन, अशी धमकी दिली. यानंतरही पीडितेने सर्व घटना आई-वडिलांना सांगितली. आई-वडिलांनी मुलीला प्रसूती होऊ दे, त्यानंतर तुझे लग्न करून देऊ, असे सांगितले. यानुसार मुलीला प्रसूतीसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीने २५ ऑगस्ट रोजी रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. रुग्णालयातील डॉक्टरांना संशय आल्यामुळे मुलीचे खरे आधारकार्ड मागितले. त्याशिवाय रुग्णालयातून सुटी देणार नसल्याचे सांगितले. यावरून आधारकार्ड दिल्यानंतर मुलीचे वय १५ वर्ष ११ महिने असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा रुग्णालयाने १८ वर्षांखालील मुलीची प्रसूती झाल्याची माहिती एमएलसी सिटी चौक पोलिसांना पाठवून दिली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक वंदना मुळे यांना अल्पवयीन बाळंतिणीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात पाठविले. उपनिरीक्षक मुळे यांनी पीडितेला दोन तास विश्वासात घेऊन विचारले असता, बाळाचे वडील हा सख्खा भाऊच असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पीडितेच्या जबाबावरून सिटी चौक पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत.
पतीचे निधन झाल्याचा बनाव
खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करताना पीडितचे वय २३ वर्ष सांगण्यात आले. तसेच तिचे आधारकार्ड मागितले असता, तिच्या नवऱ्याचे निधन झाल्याची बतावणी पीडितेच्या कुटुंबाने केली. यानंतर डॉक्टरांना संशय आल्यानंतर त्यांनी अनेक वेगवेगळ्या स्टोरी सांगितल्या. त्यामुळे संशय अधिक बळावला. त्यामुळे रुग्णालयाने जन्मदाखल्याचा पुरावा दिल्याशिवाय सोडणार नसल्याची तंबी दिल्यानंतर मुलीचे वय समोर आले. त्याची माहिती पोलिसांनी दिली. यावरून हा अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे.
अविवाहित भावाला ठोकल्या बेड्या
अल्पवयीन बहिणीवर अत्याचार करणाऱ्या अविवाहित भावाला सिटी चौक पोलिसांनी रविवारी सायंकाळी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसीखाक्या दाखविताच बहिणीवर अत्याचार केल्याचे मान्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.