आता शहरातील नाल्यांवर व्हर्टीकल गार्डन; हवेची गुणवत्ता राखण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 03:16 PM2021-09-27T15:16:45+5:302021-09-27T15:18:15+5:30
प्रायोगिक तत्त्वावर सिद्धार्थ उद्यानासमोर उपक्रमास सुरुवात
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : हवेची गुणवत्ता राखण्यासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये व्हर्टीकल गार्डन उभारण्यात येत आहेत. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार औरंगाबाद शहरातही पहिले व्हर्टीकल गार्डन उभारण्यास महापालिकेने सुरुवात केली असून, सिद्धार्थ गार्डनसमोरील नाल्याची जागा निवडण्यात आली. सुमारे ७ लाख रुपये खर्च करून हे उद्यान उभारले जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी व्हर्टीकल गार्डन दिसून येतील.
देशातील इतर शहरांच्या तुलनेत औरंगाबाद शहरातील हवा शुद्ध आहे. भविष्यात प्रदूषण वाढू नये, यादृष्टीने आतापासून वेगवेगळे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे मत वारंवार प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाकडून ३० कोटींचे अनुदानही महापालिकेला मंजूर करण्यात आलेले आहे. या निधीतून भविष्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा विचार मनपाने सुरू केला असून, सध्या सिद्धार्थ उद्यानाजवळील नाल्यावर व्हर्टीकल गार्डन उभारण्याचे निश्चित करण्यात आले. १५ फूट उंच आणि ७० फूट लांब एका बाजूची जागा आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाही तेवढीच जागा विकसित करण्यात येणार असल्याचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी काम संपेल, अशी अपेक्षा आहे. या उपक्रमामुळे हिवाळ्यात झाडे वाढण्यास बऱ्यापैकी मदत होते.
व्हर्टीकल गार्डनमध्ये शहरातील वातावरणात जगतील अशा पद्धतीचे पाच ते सहा प्रकारची वेगवेगळी झाडे लावण्यात येतील. कुंड्यांमध्ये ही झाडे राहतील. या झाडांना पाणी देण्यासाठी वेगळे नियोजन राहील. कुंड्या, झाडे चोरीला जाण्याची जास्त भीती आहे. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर उड्डाणपूल, शहरातील वेगवेगळ्या खुल्या जागांवर जाळ्या उभारून व्हर्टीकल गार्डन विकसित करण्याची योजना मनपाने आखली आहे.
शहराच्या सौंदर्यात भर पडणार
व्हर्टीकल गार्डनचा प्रयोग मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात हा पहिलाच उपक्रम आहे. नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन आणखी काही ठिकाणी अशा पद्धतीचे गार्डन उभारले जातील. निविदा काढून हे काम सुरू केले असून, १० टक्के कमी दराने कंत्राटदाराने काम घेतले आहे.