सरकारी कामात अडथळा, माजी नगरसेवकाला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 04:34 PM2021-09-30T16:34:04+5:302021-09-30T16:35:42+5:30
कार्यालयात गोंधळ घालून फिर्यादीला शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की करीत धमक्या दिल्या.
औरंगाबाद : उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या गुन्ह्यात माजी नगरसेवक सलीम पटेल दौलत पटेल व शेख मकसूद अन्सारी शेख बाबामियाँ या दोघांना सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ची शिक्षा ठोठावली.
तत्कालीन उपजिल्हाधिकारी शशिकांत मारोती हदगल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०१४ च्या मनपा निवडणुकीत फिर्यादी निवडणूक निर्णय अधिकारी होते. ३ जानेवारी २०१४ रोजी फिर्यादी त्यांच्या कार्यालयात असताना सलीम पटेल (वय ३५, रा. न्यू बायजीपुरा) आणि शेख मकसूद अन्सारी (३३, रा. रोशनगेट) व इतर सातजण तेथे आले. त्यावेळी बायजीपुराच्या मतदार यादीतून बोगस मतदारांची नावे वगळण्याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही तुम्ही कारवाई का करीत नाही, असा जाब विचारून फिर्यादीचे काहीही ऐकून न घेता दोन्ही आरोपी फिर्यादीच्या अंगावर धावून गेले.
आमदार संदीप क्षीरसागर यांची २० वर्षांपूर्वीच्या 'या' गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता
कार्यालयात गोंधळ घालून फिर्यादीला शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की करीत धमक्या दिल्या. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहायक सरकारी वकील उल्हास पवार यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.