'औरंगाबाद पोलीस मुस्कानच्या घरी गेले अन्...', प्रकाश आंबेडकरांचा पोलीस आणि सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 08:13 PM2022-03-14T20:13:03+5:302022-03-14T20:30:23+5:30
वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रन्ट यांनी औरंगाबादमध्ये कर्नाटकच्या हिजाब गर्लचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता, पण ऐनवेळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांची भूमिका आणि सरकारवर निशाणा साधला.
औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरातील आमखास मैदानावर कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खान हिचा भव्य सत्कार सोहळ्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी आयोजकांना परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र दिले. त्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भाष्य केले.
'औरंगाबाद पोलीस मुस्कानच्या घरी गेले'
'मी महाराष्ट्र सरकारला सेक्युलर समजत होतो, पण त्यांनी त्यांच्या कृतीतून सेक्युलरीझम सोडल्याचे दाखवून दिले. मी स्वतः कमीश्नरशी बोललो होतो, त्यांनी काहीही हरकत नसल्याचे सांगितले होते. त्यांनी आम्हाला परवानगीही दिली, पण काल अचानक पोलिसांनी भूमिका बदलली आणि परवानगी नसल्याचे पत्र दिले. तसेच, काही औरंगाबाद पोलीस मुस्कानच्या घरी मैसूरला गेले आणि तिला औरंगाबादच्या कार्यक्रमाला न जाण्यास सांगितले, 144 कलमाची भीती घातली. कुणाच्या घरी जाऊन सत्कारास येऊ नका, असे पोलिसांनी सांगण्याची पहीलीच वेळ आहे,' असे ते म्हणाले.
'न्यायालयाच्या निकालानंतर भव्य कार्यक्रम करणार'
ते पुढे म्हणाले की, 'पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आम्ही आज औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात आम्ही मुलभूत अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्य प्रत्येकाला असे सांगितले. मुस्लीम महिलांचा पेहराव कायद्याचा विषय होऊ शकत नाही. कोणी काय घालावं, हा ज्याचा त्याचा विष आहे. पोलिसांनी आम्हाला आयबीचा रिपोर्ट असल्याचे सांगितले. कोर्टातही पोलिसांनी तेच केले. आता कोर्टाने 22 तारखेपर्यंत पोलिसांना बाजू मांडण्यास सांगितली आहे. कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आम्ही पुढील तारीख ठरवू आणि यापेक्षा मोठा कार्यक्रम करू,' असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.