हिम्मत असेल तर बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे जावे: आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 05:55 PM2022-07-22T17:55:33+5:302022-07-22T17:57:01+5:30
आम्ही मुखवटा लावून फिरत नाही,ज्यांच्यावर डोळेझाकून विश्वास टाकला त्यांनी गद्दारी केली
औरंगाबाद: गद्दारांना जनता कधीच माफ करत नाही. ज्याला जिथे राहायचे आहे तिथे आनदाने रहा. फक्त बंडखोर आमदारांनी हिम्मत करून राजीनामा द्यावा. जनता जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल, असे खुले आव्हान युवासेना प्रमुख , माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. ते औरंगाबाद जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत.
अभूतपूर्व बंडखोरीनंतर शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. आज दुपारी नाशिक येथून आदित्य ठाकरे यांचे औरंगाबाद जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य यांनी शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. हे सरकार बेकादेशीर असल्याचा आरोप करत आदित्य यांनी सेनेतील बंडखोरांनी हिम्मत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे असे थेट आव्हान दिले. जे जनता ठरवले ते आम्हाला मान्य आहे. ज्यांना परत यायचे आहे त्यांच्यासाठी कायम दरवाजे उघडे आहेत, असेही आदित्य म्हणाले.
शिवसैनिक आणि राज्यातील जनता आमच्यासोबत
ज्या लोकांनी गद्दारी केली, पाठीत खंजीर खुपसला त्यांना आम्ही खूप दिले. एकच चूक ठरली, आम्ही त्यांच्यावर अंधविश्वास ठेवला. वर्षा बंगल्यातून निघताना अनेक आमदार हात धरून रडले. त्यांनी नंतर गद्दारी केली. त्यांची नावे घेऊ इच्छित नाही. एवढा खोटेपणा आमच्यात नाही. आम्ही मुखवटे लावून फिरत नाही. त्यांना आम्ही काय दिले, त्यांनी कोणती पदे उपभोगली, सरकार म्हणून आम्ही केलेले काम जनतेसमोर आहे. शिवसेना, मूळ शिवसैनिक आणि राज्यातील जनता आमच्यासोबत आहे, असा ठाम विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.