मृताच्या जागी बनावट व्यक्ती उभा करून भूखंडाची केली परस्पर विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 02:26 PM2021-09-15T14:26:32+5:302021-09-15T14:29:28+5:30
crime news in Aurangabad आरोपींनी मृताची बनावट कागदपत्रे तयार करून, मृत व्यक्तीच्या नावाने दुसराच व्यक्ती उभा करून भूखंड विक्री केली
औरंगाबाद : बनावट व्यक्ती उभा करून, बोगस कागदपत्रांच्या आधारे मृत व्यक्तीचा भूखंड विक्री करून, बहीण-भावाची ९ लाखांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच समोर आली. या प्रकरणी बनावट व्यक्तीसह साक्षीदार आणि मध्यस्थ अशा सहा जणांविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सालेह बिन खालेद उर्फ सलमान चाऊस, सय्यद अफसर अली सय्यद महेमूद अली, शेख रईस शेख अहेमद, शेख नदीम शेख हसन, सतीश प्रकाश दाभाडे आणि रतन बन्सी धोत्रे अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार नसीब बानो यांच्या भावाने आपले घर एका जणाला विक्री केले होते. तेव्हा खरेदीदाराने त्यांना अर्धी रक्कम दिली. उर्वरित ९ लाख रुपयांऐवजी तुम्हाला बाळापूर शिवारातील भूखंड देतो, असे सांगितले. तक्रारदार यांना भूखंड खरेदी करायचा असल्याने, त्यांनी त्यास होकार दिला. यानंतर, आरोपींनी त्यांना दाखविलेला भूखंड तक्रारदार आणि त्यांच्या भावाला पसंत आल्याने त्यांनी तो भूखंड खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
आरोपींनी तक्रारदार यांच्या भावाच्या नावे त्या भूखंडाचे खरेदीखत करून दिले. नंतर हा भूखंड नसीब बानोने भावाकडून खरेदी केला. त्या जेव्हा बाळापूर शिवारात भूखंडावर गेल्या, तेव्हा आरोपींची बनवेगिरी त्यांना समजली. त्यांना विक्री करण्यात आलेल्या भूखंडाचे मालक २०१६ साली मृत झालेले आहेत. आरोपींनी मृताची बनावट कागदपत्रे तयार करून, मृत व्यक्तीच्या नावाने दुसराच व्यक्ती उभा केला व २३ डिसेंबर, २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रजिस्ट्री कार्यालयात नोंदणीकृत खरेदीखत करून दिल्याचे समजले. याविषयी त्यांनी थेट सिटीचौक पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात कट रचून ९ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक उद्धव हाके तपास करीत आहेत.ॉ
हेही वाचा - मराठवाड्यात ४२ ठिकाणी ढगफुटी; २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान