Savitribai Phule Birth Anniversary: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला शिक्षणाचा वसा घेऊनच पुढे जातोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 03:54 PM2019-01-03T15:54:43+5:302019-01-03T16:06:53+5:30

३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. हा दिन आता राज्यात सणासारखा साजरा होत आहे. सावित्रीबाईंच्या जन्मदिनी सावित्रीच्या लेकींचे मांडलेले हे मनोगत...

Savitribai Phule Birth Anniversary: goes ahead with the education given by Gyanjyoti Savitribai Phule | Savitribai Phule Birth Anniversary: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला शिक्षणाचा वसा घेऊनच पुढे जातोय...

Savitribai Phule Birth Anniversary: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला शिक्षणाचा वसा घेऊनच पुढे जातोय...

googlenewsNext

सर्व सावित्रीबाईंचीच देण आहे... 

गणित विषयाचे नाव घेताच अनेक विद्यार्थी त्यापासून दूर जातात. गणिताला अवघड समजल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याविषयी भीती वाटते, पण गणिताएवढा सोपा विषयही कोणता नसतो. गणिताच्या संकल्पना एकदा का समजल्या की, पुन्हा त्यात रुची निर्माण होत असते. अशाच पद्धतीने महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करण्यात मागील २४ वर्षांत यशस्वी झाले असल्याचे वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. जयश्री सूर्यवंशी सांगतात. शिकविण्याचा हा वारसा आम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याकडून मिळाला. हा वसा घेऊनच आम्ही पुढे जात आहोत, असे त्या सांगतात. 

महाविद्यालयात बी.एस्सी.ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीत गणितामध्ये धोका बसलेला असतो. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी पदवीस्तरावर गणित विषय नाकारतात, असा अनुभव आहे; मात्र प्रवेशाच्या वेळी अनेक विद्यार्थ्यांची गणिताविषयी असलेली भीती दूर करण्याचे काम प्रत्येक वर्षी केले जाते. जेव्हा विद्यार्थी प्रत्यक्ष गणिताच्या तासाला बसतो, तेव्हा त्याला गणित समजले नाही, असे कधी होत नाही. प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक दिवशी शिकवणीचा तास संपल्यानंतर समाधानी असला पाहिजे, याकडे कटाक्ष असतो. चळवळीचे केंद्र असलेल्या वसंतराव नाईक महाविद्यालयात १९९४ साली गणिताच्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. अध्यापनाबरोबर संशोधनाचेही कार्य जोमाने सुरू ठेवले. आतापर्यंत त्यांनी गणित विषयाची तब्बल १० पुस्तके लिहिली आहेत. गणित विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकांच्या माध्यमातून केला.  ३० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. 

दहा वर्षे रासेयो कार्यक्रमाधिकारी
वसंतराव नाईक महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करतानाच राष्ट्रीय सेवायोजना विभागात कार्यक्रमाधिकारी म्हणून डॉ. पाटील यांनी दहा वर्षे काम केले. यातून सामाजिक प्रबोधन, उद्बोधनासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे, सामाजिक जाणीव, जागृती वाढविण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. ग्रामस्वच्छता, पाणलोट, आरोग्य, शिक्षण, उद्योजक, अंधश्रद्धा निर्मूलन, असे विविध उपक्रम या विभागामार्फत राबविले आहेत.पुण्यातील भिडेवाड्यात म. ज्योतीबा फुले यांनी सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांच्या मदतीने पहिली शाळा सुरु केली. त्या काळात सावित्रीबार्इंनी समाजाच्या विरोधाला न जुमानता, प्रसंगी शेणाचे गोळे सहन करून आपले ज्ञानदानाचे काम चालू ठेवले. त्यांनी केलेल्या त्यागाचे फलित म्हणूनच आज स्त्रिया मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आज मी ताठ मानेने जगू शकते, स्वत:ची ओळख निर्माण करु शकले ही सर्व सावित्रीबार्इंचीच देण आहे.

- डॉ. जयश्री पाटील

अभिनव प्रयोगाने जिल्हा परिषदेची देशातील पहिली आयएसओ शाळा
 

सातारा गावचे नाव घेताच पुरातन मंदिरांसोबत प्रगतिशील शाळा डोळ्यांसमोर येते. शाळेच्या मुख्याध्यापिका मंजूश्री राजगुरू यांनी गावकऱ्यांसह शाळेतील शिक्षक सहकाऱ्यांसोबत एकत्रितपणे परिश्रम घेत जिल्हा परिषदेची देशातील पहिली आयएसओ शाळा बनविण्याची किमया २०११ मध्ये केली. आयएसओ बनल्यानंतरही अभिनव उपक्रमांचे सातत्य कायम ठेवल्यामुळे २०१८ मध्येही शाळेचा दर्जा उत्तमच आहे.

उच्च विद्याविभूषित असलेल्या मंजूश्री राजगुरू यांनी १९८६ मध्ये अध्यापनास सुरुवात केली. ३३ वर्षांच्या शिक्षकी पेशात सर्वोत्तम अध्यापन करीत विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न करण्याचा प्रयत्न केला. २००७ मध्ये त्या सातारा गावातील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका बनल्या, तेव्हापासून शालेय व्यवस्थापन समिती, गावकरी आणि शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने शाळेचा कायापालट केला. शाळेचा सर्वांगीण विकास केल्यामुळे २०११ मध्ये आयएसओ प्रमाणपत्र मिळविणारी जि.प.ची देशातील ही पहिली शाळा ठरली. ही शाळाच जिल्ह्यातील इतर शाळांची आदर्श बनली. यानंतर जि.प.च्या अनेक शाळांनी आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. या शाळेत २० संगणकांची अत्याधुनिक लॅब आहे. इंग्रजी भाषेचे विद्यार्थ्यांना  नियमित प्रशिक्षण दिले जाते. किशोरवयीन मुलींच्या समस्या  तज्ज्ञांकडून सोडविल्या जातात.

शाळेत राबविले जाणारे उपक्रम
विद्यार्थ्यांसाठी कराटे प्रशिक्षण, संगणक शिक्षण, उद्बोधन वर्ग, तज्ज्ञांच्या  भेटी, मीना-राजू मंच , प्रश्नमंजूषा, स्वच्छतेविषयक उपक्रम, भित्तीपत्रक, व्यावसायिक मार्गदर्शन, नाटिका, एकांकिकांचे सादरीकरण, मैदानी खेळ, बौद्धिक स्पर्धा, पथनाट्य, मुलाखत घेणे, सामान्यज्ञान परीक्षा, लेक शिकवा अभियान, चला वाचू या, झाडे लावून त्यांना मुलींची नावे देणे, किशोरवयीन मुलींना स्वतंत्र मार्गदर्शनासह मेहंदी, रांगोळी, चित्रकला, वादविवाद, वक्तृत्व, निबंध स्पर्धाही शाळेत घेण्यात येतात, असे मंजूश्री राजगुरू यांनी सांगितले.

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
सातारा गावातील जि.प. शाळेला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल विज्ञान संस्थेने नॅशनल इन्स्पायर अवॉर्डने सन्मानित केले आहे. याशिवाय जिल्हास्तर गुणवत्तेत प्रथम, विभागीय पातळीवर प्रथम येण्याचा मानही शाळेने पटकावला आहे. याशिवाय इतरही खाजगी संस्थांमार्फतही विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यासाठीचे सगळे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे काम मुख्याध्यापिका मंजूश्री राजगुरू यांनी केले आहे.
- मंजूश्री राजगुरू, मुख्याध्यापिका, जि.प. प्राथमिक शाळा, सातारा 

सावित्रीची लेक असल्याचा मला सार्थ अभिमान 
 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी केलेल्या कार्याचा परिपाक म्हणून आज स्त्रीवर्ग एवढा सक्षम दिसतो. त्यांनी लावलेल्या शिक्षणाच्या बीजाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाचे एक पान म्हणून मी जेव्हा स्वत:कडे बघते तेव्हा सावित्रीची लेक असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असे कन्नड तालुक्यातील देवळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राणी मच्छिंद्र गुंजाळ या केवळ सांगतच नाहीत, तर प्रत्यक्षात तसे कार्यही करतात. 

त्या म्हणाल्या,  डी.एड. पूर्ण केल्यानंतर १६ जानेवारी २००९ रोजी नाशिक जिल्ह्यातील देवीतांडा येथे जि.प.च्या शाळेत मला नियुक्ती मिळाली. ही शाळा आदिवासी तांड्यावरची, येथे ना धड रस्ता, ना जाण्यासाठी वाहन. भाकरीचा चंद्र शोधण्यात वणवण भटकणारी मुले. अशा कष्टकरी समाजातील मुलांची मी शिक्षिका झाले होते; पण ज्ञानदान करताना शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच तळमळ होती. त्यामुळे या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून पालकांची भेट घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. पालकांनीही प्रतिसाद दिला. दररोज मुले शाळेत येऊ लागल्याने त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आनंददायी शिक्षणाचा प्रयोग केला. तो यशस्वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रगती वाढतच गेली आणि मुलांना शाळाच घर वाटू लागले. 

यानंतर २१ आॅगस्ट २०१४ रोजी कन्नड तालुक्यातील देवळी या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला मुलांचे वक्तृत्व चांगले कसे करता येईल, याकडे लक्ष दिले. याचा फायदाही झाला. या शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळाले. कधी तालुकाही बघितलेला नसेल, तेच विद्यार्थी तरबेज झाले. एवढा कायापालट या शाळेत झाल्याचा आनंद आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उपक्रम राबविण्याचे नियोजन चालू असून मुलांना आनंददायी व नाविन्यपूर्ण शिक्षण मिळाल्यास त्यांची प्रगती झपाट्याने होते, हाच धागा पकडून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. 

ज्ञानदानात मिळाला खारीचा वाटा
या शाळेची वाटचाल सावित्रीबाईंच्या विचारांची मशाल पेटविणारी आहे. सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यांची जिद्द हाच मुळी इतिहास आहे. इतिहासापासून प्रेरणा घ्यायची असते. अशीच प्रेरणा घेऊन विद्यार्थी घडविण्याचे काम प्रामाणिकपणे करण्यात मला आनंद आहे. जर सावित्रीबाई झाल्या नसत्या तर रांधा, वाढा आणि उष्टी काढा हेच स्त्रियांच्या नशिबी आले असते. चूल आणि मूल यापुरतेच स्रियांचे आयुष्य बेडीत अडकले असते. मला शिक्षिका म्हणून काम करताना सावित्रीबार्इंच्या कार्यात खारीचा वाटा मिळतोय, यातच माझे समाधान आहे, असे राणी गुंजाळ यांनी सांगून शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली.

- राणी गुंजाळ, जि.प. शाळा, देवळी, ता. कन्नड

ज्ञानाची सांगड अनुभवाशी घालून कृतियुक्त शिक्षण...

ज्ञानाची सांगड अनुभवाशी घालून विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देण्यावर भर देऊन सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे कार्य सोबलगाव येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुमित्रा वामनराव घुगे या करीत आहेत.
एक महिला शिक्षिका समाज व शाळा यांच्यामधील अंतर आपल्या कर्तृत्वाने  कमी करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करू शकते, हे त्यांच्या कार्यातून दिसून येते. २००९ मध्ये सोबलगाव येथे नियुक्ती झाल्यापासून आपल्या वर्गातील विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होण्यासाठी अध्यापनात नवनवीन प्रयोग करण्यावर त्या भर देतात. विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिकता यावे यासाठी सुंदर असे वर्ग सुशोभित करून वर्गातील भिंती या खऱ्या अर्थाने बोलक्या केल्या आहेत. 

पाठ्यपुस्तकातील विविध संकल्पना, चित्रे भिंतीवर रंगविली आहेत. विद्यार्थ्यांना हसत-खेळत अनुभव देण्यासाठी त्यांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे, मणी, चिंचोके, गोट्या, काड्या, पाने, फुले यांचा वापर त्या आपल्या अध्यापनात करतात. त्यामुळे  गणितासारख्या विषयाची भीती मुलांना  वाटत नाही, त्यामुळे ते आनंदाने अध्ययन करतात. पहिलीत विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यानंतर त्याची संपूर्ण पार्श्वभूमी माहीत करून त्याच्या आई-वडिलांना मुलांच्या अभ्यासाबाबत वेळोवेळी जागृत करण्यासाठी पालक भेटी, माता-पालक बैठक, माता प्रबोधन यासारखे उपक्रम त्या राबवतात. त्यामुळे पालक आपल्या मुलांच्या अभ्यासाबाबत जागृत झाले आहेत. 

दररोज मुलांच्या वहीवर स्वत: अभ्यास लिहून देऊन दुसऱ्या दिवशी न चुकता तो तपासणे, विद्यार्थ्यांच्या झालेल्या चुकांबद्दल पालकांना अवगत करून सुधारण्यासाठी प्रयत्न करणे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यात सातत्य ठेवणे या गोष्टीकडे सातत्याने लक्ष दिले जाते. वेगवेगळ्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कलागुणांना वाव दिल्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे कार्य त्या करीत आहेत.

बक्षिसांच्या रकमेचा वापर शाळेला
शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी २०१४ पासून दरवर्षी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात त्यांचा सहभाग मोलाचा असतो. यावेळी येणाऱ्या बक्षिसाच्या रकमेतून विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्टर, संगणक अशा वस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत. दरवर्षी परिसर भेटी, सहली अशा उपक्रमांच्या आयोजनात सहभाग घेऊन भौगोलिक, ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यामुळे ते त्यांच्या कायम लक्षात राहतात. शाळेतील विद्यार्थिनींना स्वसंरक्षण, आत्मनिर्भरता या बरोबरच स्वावलंबनाचे शिक्षण देऊन आज खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकींना शिक्षण देऊन जागृत करण्याचे कार्य त्या करीत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
- सुमित्रा घुगे,जि.प. शाळा सोबलगाव,ता. खुलताबाद

 

( शब्दांकन : राम शिनगारे, सुरेश चव्हाण, सुनील घोडके )

Web Title: Savitribai Phule Birth Anniversary: goes ahead with the education given by Gyanjyoti Savitribai Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.