धक्कादायक ! सोळा दिवसांनंतरही अहवाल पॉझिटिव्ह; मात्र सुटीच्या नियमामुळे रुग्णालयाने पाठवले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:53 PM2020-05-23T19:53:58+5:302020-05-23T19:56:50+5:30
जिल्हा रुग्णालयात गर्दी नसताना ‘आयसीएमआर’च्या नियमावर बोट ठेवून सुटी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या तरुणाचा अहवाल दहाव्या व सोळाव्या दिवशीही पॉझिटिव्ह आला. दरम्यान, ‘आयसीएमआर’च्या नियमावर बोट ठेवून त्या तरुणास जिल्हा रुग्णालयाने बुधवारी सुटी देऊन घरी पाठविले. दोन दिवसांनंतर महापालिकेला जाग आली आणि त्यास शुक्रवारी पुन्हा भरती होण्यासाठी तयार राहण्यास सांगितले. या घडामोडीवरून आरोग्य यंत्रणेतच ताळमेळ नसल्याची बाब अधोरेखित झाली आहे.
पुंडलिकनगर येथील महिला व तिच्या मुलाच्या तपासणीसाठी मनपाच्या आरोग्य केंद्राने स्वॅब घेतला. त्या दोघांचाही तपासणी अहवाल ४ मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ते दोघेही त्याच दिवशी भरती झाले. सोळाव्या दिवशी सदरील महिला कोरोनामुक्त झाली. मात्र, तिच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, अहवाल काहीही आला, तरी सुटी द्यावी लागेल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी रुग्णाला फोन करून कळविले होते.
१४ दिवस अलगीकरणात राहण्याचे सांगून ती कोरोनामुक्त महिला व पॉझिटिव्ह तरुण रुग्णाला घरी सोडण्यात आले. दोन दिवसांनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली. ते माय-लेक एकाच घरात राहत असल्याचे समजल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी सकाळी फोन करून त्या तरुणाला भरती व्हावे लागेल, तयार राहा, अशा सूचना केल्या.
ही बाब मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्यापर्यंत पोहोचल्यावर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. आयुक्तांनी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना फोन केला. पाडळकर यांनी तब्येत चांगली असेल, तर भरती होण्याची गरज नाही, असे आयुक्तांना फोनवर सांगितले व दोन परिचारिकांमार्फत त्या तरुणाच्या घरी गोळ्या पाठविल्या. सध्या त्या तरुणाला अशक्तपणा व खोकला आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणेत कसलाही ताळमेळ नसल्याचे चित्र समोर आले आहे, तर जिल्हा रुग्णालयात गर्दी नसताना ‘आयसीएमआर’च्या नियमावर बोट ठेवून सुटी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.