सिल्लोड निवडणूक निकाल: 'मातोश्री शब्द फिरवत नाही, मी मंत्री होणार'; विजयानंतर सत्तारांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 03:12 PM2019-10-24T15:12:16+5:302019-10-24T15:12:30+5:30
Sillod Election Results 2019: उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदाचा शब्द दिला
औरंगाबाद : सिल्लोड मतदारसंघात सनसनाटी विजय मिळवल्यानंतर शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांनी युतीच्या सत्तेत मी मंत्री होणारच असा दावा करत 'मातोश्री आपला शब्द फिरवत नाही' अशी पुस्ती जोडली.
विजय मिळवल्यानंतर सत्तार पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी ते म्हणाले, मतदार संघातील हिंदू मतदारांचे मी विशेष करून आभार मानतो. त्यांचे उपकार मी विसरणार नाही. तसेच मी मंत्री होणार, मंत्री पदाचा शब्द उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर दिला होता. मातोश्री आपला शब्द फिरवत नाही, असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमधून सनसनाटी विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल 1 लाख 22 हजार 627 मते घेत 24 हजार 465 मतांनी विजय साकार केला. लोकसभा निवडणुकीत पक्षासोबत मतभेद झाल्याने अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसचा त्याग केला. यातच ते भाजपमध्ये जाताजाता शिवसेनेत स्थिरावले. या घटनाक्रमामुळे चर्चेत असलेल्या सिल्लोड मतदार संघात कॉंग्रेसमधून सेनेत आलेल्या अब्दुल सत्तार यांना जनता स्वीकारेल का हा प्रश्न अनेकांना होता. त्यांना अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांनी तगडे आव्हान दिले होते. मतदारसंघातील सत्तार विरोधक एकवटून पालोदकर यांच्या मागे उभे राहिल्याने शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नव्हती.