शिक्षक दिन : शिक्षकामुळेच आज आयपीएस बनले : मोक्षदा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 03:18 PM2019-09-05T15:18:32+5:302019-09-05T15:20:49+5:30
मराठी साहित्य शिकविणारे शिक्षक प्रवीण चव्हाण हे आदर्श
औरंगाबाद : शालेय जीवनापासून ते भारतीय पोलीस सेवेत येईपर्यंत अनेक शिक्षक भेटले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची पुणे येथे तयारी करीत असताना एका खाजगी कोचिंग क्लासेसचे मराठी साहित्य शिकविणारे प्रवीण चव्हाण सर हे माझ्यासाठी आदर्श शिक्षक आहेत.
चव्हाण सरांमुळेच आज मी आयपीएस अधिकारी होऊ शकले. आयपीएस अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणारी क्षमता माझ्यात असल्याचे त्यांनीच मला पटवून दिले. एवढेच नव्हे तर त्यांनी मला वेळोवेळी अचूक मार्गदर्शन केले. चव्हाण सर नसते तर आयपीएस अधिकारी होण्याची क्षमता माझ्यात आहे, हे मला आयुष्यभर कळाले नसते, अशी कृतज्ञतेची भावना औरंगाबादच्या जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी त्यांच्या शिक्षकांप्रती व्यक्त केली.
मोक्षदा पाटील म्हणाल्या की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे येथे गेले तेव्हा या परीक्षेत यश मिळेल अथवा नाही, याबाबत मनात साशंकता होती. द्विधा मन:स्थिती असताना खाजगी कोचिंग क्लास चालविणारे प्रवीण चव्हाण सर भेटले. ते मराठी साहित्य शिकवीत असत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आणि क्षमता माझ्यात असल्याचे चव्हाण सरांनी पटवून दिले. त्यांच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. मराठी साहित्याची आपल्याला बालपणापासून आवड असल्याचे पाहून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी ऐच्छिक विषय म्हणून मराठी साहित्य निवडला होता. त्यांनी सतत अचूक मार्गदर्शन केल्याने आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
आई-वडील हे पहिले गुरु
माझे आई-वडील हे पहिले तर चव्हाण सर हे आयुष्याला कलाटणी देणारे दुसरे गुरू आहेत. आई-वडील आणि चव्हाण सरांमुळे आज आपण येथे आहोत. आई-वडिलांनी आपल्याला स्त्री-पुरुष, जाती-भेद, धर्म-भेद असे कधीच करू दिले नाही. घरातूनच मला सर्वधर्म समभावाची शिकवण मिळाली. आयपीएस अधिकारी कधीच जाती-धर्मानुसार विचार करीत नाही. मला सर्वधर्म समभावाचे घरातूनच बाळकडू मिळाले असल्याने आता पोलीस अधीक्षक म्हणून काम करीत असताना त्याचा लाभ होतो.
कठोर परिश्रम घेण्याची प्रेरणा मिळाली
चव्हाण सरांनी आपल्या क्षमतांना आव्हान दिले. परीक्षेची तयारी करीत असताना होत असलेल्या चुका कठोरपणे सांगितल्या. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपल्याला न थकता सतत अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्यामुळेच मी कठोर परिश्रम करून यश संपादन करू शकले. सरांच्या मार्गदर्शनामुळेच मला जाणीव झाली होती की, मी ज्या पद्धतीने विचार करते ते योग्य आहे किंवा नाही. एवेढच नव्हे तर माझ्या बुद्धीला अजून धार येण्यासाठी काय करावे लागेल, यादृष्टीने सतत प्रयत्न करीत असत.
धडाकेबाज कामगिरीने वेधले लक्ष
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी पाच महिन्यांपूर्वी रुजू झाल्यापासून मोक्षदा पाटील यांची धडाकेबाज कामगिरी सुरू आहे. ऑनलाईन फसवणूक झालेल्या नागरिकांना त्यांनी त्यांचे पैसे परत मिळवून दिले. चोरट्यांनी पळविलेला सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल त्यांनी तक्रारदारांना परत केला. शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या तीन ते चार गँगचा पर्दाफाश करून त्यांंना अटक केली.
( शब्दांकन : बापू सोळुंके )