थरारक ! दारूच्या पैशांवरून मित्रांमध्ये वाद; अवघ्या तीन सेकंदांत चाकूने भोसकून केला घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 06:56 PM2021-10-11T18:56:46+5:302021-10-11T18:59:00+5:30
Murder in Aurangabad : पळत येत पाठीमागून चाकूने भोसकले आणि माघारी पळून गेला.
औरंगाबाद : दारू पिण्यावरून झालेल्या वादातून अवघ्या तीन सेकंदांत विश्वास वॉइन शॉपीच्या काउंटरवरच एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. बजरंग चौकातील वाइन शॉपमध्ये रविवारी रात्री ९ वाजून १४ मिनिटांनी ही थरारक घटना घडली. खून केल्यानंतर आरोपी पळून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सिडको पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग चौकातील वाइन शॉपीत दारू विकत घेण्यासाठी सिद्धार्थ रंगनाथ हिवराळे (३५, रा. मथुरानगर, एन-६, सिडको) हा ९ वाजून १२ मिनिटांनी दाखल झाला. त्याच्या पाठीमागेच विशाल आगळे ९ वाजून १४ मिनिटांनी पळतच आला. त्याने पळत येत सिद्धार्थला चाकूने भोसकले आणि माघारी पळून गेला. अवघ्या तीन सेकंदांची ही घटना वॉइन शॉपीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सिद्धार्थ आणि विशाल हे दोघे मित्र असून, विशाल हा दारू पिऊन बजरंग चौकात रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान शिव्या देत फिरत होता. सिद्धार्थ तेथे आल्यानंतर दोघांमध्ये दारूच्या पैशावरून वाद झाले. त्यानंतर सिद्धार्थ दारू घेण्यासाठी दुकानात जाताच विशालने पाठीमागे पळत येऊन चाकू खुपसला. एकाच घावात सिद्धार्थ खाली कोसळला. उपस्थितांनी तात्काळ त्यास एमजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे काही वेळ उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलविला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी
बजरंग चौकात खून झाल्याची घटना वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरली. सिडको पोलीस ठाण्यातील विशेष पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ आणि उपायुक्त दीपक गिऱ्हेही घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. याशिवाय उपनिरीक्षक अशोक अवचार, रतन डोईफोडे, रमेश राठोड यांच्यासह गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
आरोपीच्या शोधार्थ दोन पथके
खून करून पळून गेलेला संशयित आरोपी विशाल आगळे हा मोंढा नाका परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. त्याला पकडण्यासाठी सिडको ठाण्याच्या विशेष पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड आणि गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांच्या टीम रवाना झाल्या. सकाळपर्यंत आरोपीला अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
हेही वाचा :
- 'तुझ्यासाठी मला देवाने पाठविले'; महिलेवर अत्याचारानंतर पुजाऱ्याचा मुलीवरही अतिप्रसंग
- खळबळजनक ! प्राध्यापकाचा राहत्या घरात गळा चिरून निर्घृण खून