Uddhav Thackeray: 'व्यासपीठावर उपस्थित माझे भावी सहकारी...', दानवे व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं विधान, सर्वांच्या भुवया उंचावल्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 11:25 AM2021-09-17T11:25:54+5:302021-09-17T11:36:13+5:30
Uddhav Thackeray: मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या एका विधानानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Uddhav Thackeray: औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे एकाच व्यासपीठावर होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या एका विधानानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी भविष्यात भाजपासोबतच्या युतीबाबतचं सूचक विधानच केल्याचं औरंगाबादमध्ये पाहायला मिळत आहे.
हे रडीचे डाव... सोनू सूदच्या घरावरील धाडीनंतर शिवसेनेचा केंद्रावर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना 'व्यासपीठावर उपस्थित आजी, माजी आणि भविष्यात एकत्र आलो तर माझे भावी सहकारी...', असं विधान केलं आणि यावेळी मुख्यमंत्र्यांचा रोख भाजपाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या दिशेनं होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाची कार्यक्रमात जोरदार चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आजी सहकारी म्हणजेच काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकारी म्हणून उपस्थित भाजपाचे नेते असा उल्लेख केल्यानंतर भविष्यात एकत्र आलो तर भावी सहकारी असं म्हणत त्यांनी भाजपा नेत्यांकडे पाहिलं. उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे.
चंद्रकांत पाटीलही म्हणाले माजी मंत्री म्हणू नका!
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच एका कार्यक्रमात मला आता माजी मंत्री म्हणू नका एक-दोन दिवसांत काय ते कळेल, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचे संदर्भ लावले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या एका विधानामुळे लगेच तर्कवितर्क लावण्याची काही गरज नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.
माझ्या कानावर आलंय, चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार, त्यांना माझ्या शुभेच्छा: संजय राऊतhttps://t.co/PBXkWYeprK
— Lokmat (@MiLOKMAT) September 17, 2021