1 लाख 80 हजार गाड्या मारुती बाेलावणार परत; सुरक्षेसंबंधी त्रुटी असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 08:37 AM2021-09-04T08:37:32+5:302021-09-04T08:37:46+5:30
माेफत दुरुस्ती करून देणार
नवी दिल्ली : भारतातील सर्वात माेठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने १ लाख ८० हजाराहून अधिक वाहने परत मागविण्याची घाेषणा केली. या गाड्यांमध्ये सुरक्षेसंबंधी संभाव्य त्रुटीचा तपास करून ती दूर करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने पेट्राेलवर चालणारी आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ४ मे २०१८ ते २७ ऑक्टाेबर २०२० या कालावधीत उत्पादन केलेल्या १ लाख ८१ हजार ७५४ गाड्या परत मागविण्यात येणार आहेत. त्यात सियाझ, एर्टिगा, व्हिटारा ब्रीझा, एस-क्राॅस आणि एक्सएल-६ या माॅडेल्सचा त्यात समावेश आहे. या गाड्यांमध्ये सुरक्षेसंबंधी काही त्रुटी आढळून आल्या आहेत. तपासणी केल्यानंतर परिणाम झालेले सर्व सुटेभाग माेफत बदलून देण्यात येतील. याबाबत कंपनीच्या अधिकृत वर्कशाॅपमधून ग्राहकांना संपर्क करण्यात येईल.
नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू हाेईल, असे कंपनीने म्हटले आहे. ताेपर्यंत ग्राहकांनी पाणी भरलेल्या ठिकाणी प्रवास करू नये, असे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्राॅनिक भागावर पाणी पडणार याची काळजी घेण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे.
सेमिकंडक्टर चीपचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे वाहन उत्पादनावर माेठा परिणाम झाला आहे. सप्टेंबरमध्ये सर्वच कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम हाेण्याची शक्यता असून, मारुती सुझुकीला या दुरुस्तीमुळे दुहेरी फटका बसणर आहे.
आपली गाडी या यादीत आहे का, याची ग्राहक स्वत:देखील माहिती घेऊ शकतात. त्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर संबंधित माॅडेलच्या लिंकवर जाऊन चेसिस नंबर टाकल्यास माहिती उपलब्ध हाेईल. चेसिस नंबर वाहन आयडी प्लेटवर एम्बॉस्ड असताे. तसेच वाहनाचे बिल आणि नाेंदणीच्या कागदपत्रांमध्येदेखील नमूद केलेला असताे.