Mahindra Thar मध्ये तांत्रिक बिघाड, कंपनीनं डिझेल गाड्या मागवल्या परत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 06:01 PM2021-02-04T18:01:20+5:302021-02-04T18:06:35+5:30
Mahindra Thar Recalled: जाणून घ्या काय आहे कारण
Mahindra Thar Recalled: देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रानं गुरूवारी Mahindra Thar च्या डिझेल व्हेरिअंटच्या काही गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीनं तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १ हजार ५७७ गाड्या परत मागवल्या. तांत्रिक बिघाड दुरूस्त केल्यानंतर त्या गाड्या त्यांच्या मालकांकडे पुन्हा सुपुर्द करण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी नज्या गाड्यांचं उत्पादन करण्यात आलं त्या गाड्या पुन्हा मागवण्यात आल्या आहेत. पुन्हा मागवण्यात आलेल्या गाड्यांच्या कॅमशॉफ्ट मध्ये काही समस्या उद्भवू शकतात असं सांगण्यात आलं. सप्लार्स प्लांटमधील मशीन्समध्ये झालेल्या गडबडीमुळे ही समस्या उद्भवली असल्याचं कंपनीनं म्हटलं.
ज्यांच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत त्यांच्या मालकांशी लवकरच संपर्क साधला जाणार असून आवश्यक ती दुरूस्ती करून त्या गाड्या पुन्हा त्यांच्या मालकांकडे सोपवण्यात येतील. यासाठी गाड्यांच्या मालकांना आपल्या जवळच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये आपली गाडी आणावी लागणार आहे. तसंच त्या ठिकाणी गाड्या तपासून आवश्यक स्पेअर पार्ट्स वगैरे बदलण्यात येतील. तसंच यादरम्यान करण्यात आलेल्या बदलांसाठी कंपनी कोणतंही शुल्क आकारणार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीनं आपल्या Mahindra Thar चं नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केलं होतं. या नव्या एसयूव्हीला ग्राहकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. लाँच झाल्यानंतर महिन्याभरातच जवळपास साडेसहा हजार गाड्या बुकही झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी कंपनीनं आपल्या अन्य गाड्यांसह Mahindra Thar च्या किंमतीतही वाढ केली होती.