आजपासून १७ गाड्या होणार बंद; आरडीईचे नवे नियम लागू झाल्याचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 09:34 AM2023-04-01T09:34:42+5:302023-04-01T09:35:46+5:30
१ एप्रिल २०२३पासून भारतीय वाहन उद्योगात रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई)चे नवीन उत्सर्जन नियम लागू होतील.
मुंबई : १ एप्रिल २०२३ नंतर भारतीयकार बाजारात १७ कार बंद होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक होंडाच्या ५, महिंद्राच्या ३, ह्युंदाई आणि स्कोडाच्या २-२ कार, रेनो, निसान, मारुती सुझुकी, टोयोटा आणि टाटा यांच्या प्रत्येकी एक कारचा समावेश आहे. यातील बहुतेक गाड्या डिझेलच्या आहेत.
१ एप्रिल २०२३पासून भारतीयवाहन उद्योगात रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई)चे नवीन उत्सर्जन नियम लागू होतील. हे नियम लागू होताच, कार उत्पादकांना त्यांच्या कारचे इंजिन अपडेट करावे लागतील किंवा ते बंद करावे लागतील. नवीन नियमांमुळे उत्सर्जन मानके कंपन्यांना पाळावी लागणार असून, त्याचा थेट बोजा ग्राहकांवर पडणार आहे.
ग्राहकांवर पडणार बोजा
वाहनांना नवीन उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी, विद्यमान मॉडेल्सची इंजिने अपडेट करावी लागतील. त्यामुळे कंपन्या वाहनांच्या किमती वाढवत आहेत. २०२० मध्ये बीएस ६ इंजिनमुळे कारच्या किमती ५० ते ९० हजार, तर दुचाकींच्या किमती ३ ते १० हजार रुपयांनी वाढल्या होत्या. आताही कंपन्या वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहेत.
ह्युंदाई माेटर्सने केली सुरुवात
केंद्र सरकार कठोर असल्याने ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या आय-२० कारचे डिझेल व्हेरियंट आधीच बंद केले आहे. याआधी टोयोटा आणि फोक्सवॅगननेही त्यांच्या डिझेल कार बंद करण्याची घोषणा केली आहे.
गाडीमध्ये बदल करावे लागणार
वाहनांच्या आरडीईनुसार, बीएस६ फेज-२ नियम १ एप्रिलपासून लागू होतील. अशा परिस्थितीत, या वाहनांना आरडीई मानदंडांची पूर्तता करणे कठीण होईल आणि कार निर्मात्या कंपन्यांना वाहनांची विक्री थांबवावी लागेल.