अतिरिक्त प्रदूषणामुळे फोक्सवॅगनला १७१ कोटींचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:07 AM2019-01-16T06:07:35+5:302019-01-16T06:07:51+5:30
हरित लवादाची कारवाई; आरोग्याला घातक नायट्रोजन ऑक्सॉइडचे उत्सर्जन केल्याचा ठपका
नवी दिल्ली : अतिरिक्त नायट्रोजन ऑक्सॉइडचे (एनओएक्स) उत्सर्जन करणाऱ्या गाड्यांमुळे दिल्लीत झालेले वायुप्रदूषण आणि त्यामुळे झालेली आरोग्याची हानी याला जबाबदार धरत राष्ट्रीय हरीत लवादाने (एनजीटी) जर्मनीची कंपनी फोक्सवॅगनला १७१.३४ कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे.
भारतात फोक्सवॅगनच्या ३.२७ लाख गाड्या आहेत. याचा विचार करूनच हा दंड ठरवण्यात आला आहे. या कारमधून होणारे नायट्रोजन ऑक्सॉइडचे अतिरिक्त उत्सर्जन लपवण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला होता. नायट्रोजन आॅक्सॉइडमुळे ह्रदय आणि फुफ्फुसांचे आजार होतात.
राजधानी दिल्लीत २०१६मध्ये या कंपनीच्या कार्सनी जवळपास ४८.६८ टन एनओएक्स हवेत सोडला. यामुळे आरोग्याची मोठी हानी झाली. दिल्लीसारख्या शहराला आधार मानून जवळपास १७१.३४ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे हरित लवादाच्या चार सदस्यीय समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. समितीने केवळ आरोग्याची किती हानी झाली असेल, याचा अंदाज लावून हा दंड ठोठावला आहे.
रस्त्यावरील वाहनांद्वारे होत असलेल्या वायू प्रदूषणासंदर्भात सूचना करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने चार सदस्यीय समितीची स्थापना केली होती. वाहन निर्मात्या कंपन्यांनी पर्यावरण नियमांचे पालन केले की नाही, नसेल तर त्यातून पर्यावरणाची काय हानी झाली, यांचा अभ्यास करण्यास या समितीला सांगण्यात आले होते. (वृत्तसंस्था)