मंदीचा विळखा : 30 स्टील कंपन्यांना लागले टाळे; टाटा मोटर्सने उत्पादन थांबविले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 04:29 PM2019-08-03T16:29:48+5:302019-08-03T18:02:20+5:30
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारतातील उद्योग मंदीच्या विळख्यात अडकू लागले आहेत. वाहन क्षेत्राने तर ...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारतातील उद्योग मंदीच्या विळख्यात अडकू लागले आहेत. वाहन क्षेत्राने तर गेल्या काही महिन्यांत विक्रीमध्ये कमालीची घसरण नोंदविली आहे. यामुळे अनेक शोरूम बंद पडू लागले असून या क्षेत्रावर अवलंबून असलेले जवळपास 10 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
वाहन क्षेत्राने या वर्षीच्या सुरुवातीपासूनच विक्रीमध्ये घसरण नोंदविली आहे. भारताची सर्वात मोठी कंपनी मारुतीलाही याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे कंपनीने काही दिवसांसाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. वाहन कंपन्यांनी उत्पादन थांबविल्याने याचा थेट फटका स्टील इंडस्ट्रीला बसला आहे. जमशेदपूरमधील 30 स्टील कंपन्यांनी काही दिवसांसाठी उत्पादन थांबवत टाळे ठोकले आहे. तर तेथील टाटा मोटर्सच्या प्रकल्पाने उत्पादन थांबविले आहे.
गुरुवारी जमशेदपूरमधील आदित्यपूर इंडस्ट्रियल एरियातील 12 स्टील कंपन्यांनी काम बंद करत टाळे ठोकले. तर अन्य 30 कंपन्यांनाही येत्या काही काळात टाळे ठोकण्याची तयारी सुरु केली आहे. या सर्व कंपन्या टाटा मोटर्सला गाड्यांसाठी सुटे भाग पुरवितात. मागणी घटल्याने टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात सलग चौथ्यांदा काम थांबविले आहे. गुरुवार ते शनिवार कंपनीने काम थांबविले आहे. रविवारी कंपनीला सुटी असते.
तसेच कंपनीने 1 हजार कर्मचाऱ्यांना 12 ऑगस्टलाच कामावर येण्याची सूचना केली आहे. तर नियमित कर्मचारी 5 ऑगस्टपासून कामावर येणार आहेत. गेल्या दोन महिन्यात कंपनीमध्ये केवळ 15 दिवस काम झाले आहे.
30 हजार लोकांच्या रोजगारावर संकट
जमशेदपुर, आदित्यपुरमध्ये जवळपास व्हेंडर कंपन्यांच्या 30 हजार लोकांच्या रोजगारावर संकट उभे ठाकले आहे. त्यातच राज्य सरकारने विजेचे दरही वाढविल्याने त्याचा फटकाही कंपन्यांना बसला आहे.