40 टक्के इथेनॉल, ६० टक्के इलेक्ट्रीक; फ्लेक्स फ्युअलवरील इनोव्हाचे प्रोटोटाईप लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 03:02 PM2023-08-29T15:02:18+5:302023-08-29T15:02:33+5:30
हे नवीन तंत्रज्ञान नाहीय. पहिल्यांदा 1990 च्या दशकात हे तंत्रज्ञान सादर केले गेले होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्लीतील एका कार्यक्रमात जगातील पहिली इलेक्ट्रीफाईड फ्लेक्स फ्युअल कारचा प्रोटोटाईप Toyota Innova Hycross लाँच केली आहे. या कारला पूर्णपणे टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतातच तयार केले आहे. ही कार ४० टक्के इथेनॉल आणि ६० टक्के इलेक्ट्रीक एनर्जीवर चालणार आहे.
ही नवीन इनोव्हा कार 60 टक्के विजेवर आणि 40 टक्के बायो इथेनॉलवर चालणार आहे. यामुळे फ्लेक्स इंधनामुळे कारच्या मायलेजमध्ये झालेली घट भरून काढली जाणार आहे. कारचे इंजिन उणे 15 डिग्री सेंटीग्रेड तापमानातही चालणार आहे.
सामान्य इंजिन वापरले तर इथेनॉल जास्त पाणी शोषून घेत असल्याने इंजिनमधील पार्टना गंज पकडण्याची शक्यता आहे. हे इंजिन पूर्णपणे भारतातच बनविलेले आहे. तसेच गंजरोधक पार्ट वापरण्यात आले आहेत. सध्या या इंजिनचा प्रोटोटाईप तयार करण्यात आला असून लवकरच त्य़ाचे उत्पादनही केले जाणार आहे.
फ्लेक्स फ्यूअल असलेल्या इंजिनमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल वापरता येते. पेट्रोल आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलच्या मिश्रणातून बनविलेले हे इंधन आहे. हे नवीन तंत्रज्ञान नाहीय. पहिल्यांदा 1990 च्या दशकात हे तंत्रज्ञान सादर केले गेले होते. 1994 मध्ये सादर केलेल्या फोर्ड टॉरसमध्ये वापरले गेले होते. 2017 पर्यंत, जगातील रस्त्यांवर सुमारे 21 दशलक्ष फ्लेक्स-इंधनावर चालणारी वाहने होती.
इथेनॉल इंधन प्रमाणित पेट्रोलच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. पेट्रोलची किंमत 100-106 रुपये आहे, तर इथेनॉलची किंमत 60 ते 70 रुपये आहे. यामुळे इथेनॉ़ल पेट्रोलच्या तुलनेत परवडणारे आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही मदत करणारे आहे.