माझी अल्टो कार 144 च्या वेगाने पळवून दाखवा; मालकाचे वाहतूक पोलिसांना चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 02:38 PM2019-09-16T14:38:58+5:302019-09-16T14:41:33+5:30
नवे वाहतुकीचे नियम लागू झाल्यानंतर नवनवीन किस्से समोर येत आहेत.
नवी दिल्ली : नवे वाहतुकीचे नियम लागू झाल्यानंतर नवनवीन किस्से समोर येत आहेत. कोणाला 6 लाखांचा दंड तर कोणी दुचाकीच पेटविल्याचे प्रकार घडत आहेत. काल तर एका युवतीने वाहतूक पोलिसांनाच आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. मात्र, याचबरोबर वाहतूक पोलिसांच्या चुकाही समोर येत आहेत.
यावेळचा कहर उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. दिल्लीतील एका अल्टो कारच्या मालकाला पोलिसांनी 144 किमीने कार चालविल्याची पावती पाठविली आहे. धक्कादायक म्हणजे या ऑनलाईन पावतीवर फोटो मात्र बलेनो कारचा आहे. यामुळे चलन पाहून अल्टोचा मालकही चक्रावला आहे.
याबाबतचा किस्सा त्याने ट्विटवर शेअर करत थेट उत्तर प्रदेश पोलिसांनाच आव्हान दिले आहे. मारुतीची अल्टो ही छोटी कार आहे. नवीन असताना ही कार 144 च्या वेगाने धावतही असेल. पण या मालकाची अल्टो 9 वर्षे जुनी आहे. तसेच चलनावर नंबर मात्र याच अल्टो कारचा नमूद आहे.
Dear @uptrafficpolice You have filed a wrong #challan with my car no. I drive an Alto and you have registered a Baleno driving at 144kmph with my car no.
— SarkDeb (@SarkDeb) September 13, 2019
Sir, you can take my 9-year old Alto for a drive n try to touch 144kmph with it. If you can do it, I will pay Rs 2k as fine. pic.twitter.com/r1v0fMzqdl
याचा उल्लेख करत या अल्टो कार मालकाने उत्तर प्रदेश पोलिसांना, तुम्ही चुकीची पावती केली आहे. मी अल्टो चालवतो आणि तुम्ही 144 किमीने जाणाऱ्या बलेनोचा फोटो काढून माझ्या अल्टोच्या नंबरवर 2000 रुपयांचा दंड आकारला आहे.
यावरून उत्तर प्रदेश पोलिस ट्रोल होऊ लागले असून या अल्टो मालकाने पोलिसांना त्याची 9 वर्षे जुनी अल्टो कार 144 च्या वेगाने पळवून दाखविण्याचे आव्हान दिले आहे. तसेच पोलिसांनी जर करून दाखविले तर तो 2000 रुपयांचा दंडही भरण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
यावर एका युजरने या मालकाला तुझ्या गाडीचा नंबर दुसऱ्या कारवर कसा असा प्रश्न विचारला आहे. यावर त्याने तेच मी ही विचारतोय, तो उत्तर प्रदेश आहे, तिथे काहीही होऊ शकते, असे खोचक उत्तर दिले आहे.