जिल्ह्यातील वाहन क्षेत्रात कोटींची उलाढाल; साडेआठ महिन्यांत ११,७०९ नवीन वाहनांची विक्री
By महेश सायखेडे | Published: September 18, 2022 05:35 PM2022-09-18T17:35:42+5:302022-09-18T17:37:01+5:30
कोविड लॉकडाऊनमुळे लागला होता मोठा ब्रेक, आता परिस्थिती पूर्वपदावर
महेश सायखेडे, वर्धा: कोविड संकट काळात जाहीर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा विविध क्षेत्राला चांगलाच फटका बसला. पण नंतर कोविडचा जोर ओसरल्याने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आलेत. निर्बंध हटविण्यात आल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यातील व्हेईकल क्षेत्रात चांगलीच उलाढाल होत असून मागील साडेआठ महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ११ हजार ७०९ नवीन वाहनांची खरेदी नागरिकांनी केल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आहे.
उपप्रादेशिक परिवहनला मिळाला मोठा महसूल
मागील साडेआठ महिन्यांत जिल्ह्यात ११ हजार ७०९ वाहनांची नागरिकांनी खरेदी केल्याचे वास्तव आहे. याच नवीन वाहनधारकांनी रितसर विविध कर भरल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाला मोठा महसूलच प्राप्त झाला आहे. नवीन वाहन खरेदी-विक्रीच्या उलाढालीतून उपप्रादेशिक परिवहन विभागाला प्राप्त झालेला महसूल लाखाेंच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.
दुचाकींना सर्वाधिक पसंती
मागील साडेआठ महिन्यांच्या काळात ११ हजार ७०९ नवीन वाहनांची खरेदी नागरिकांनी केली असली तरी यात सर्वाधिक दुचाकींचा समावेश आहे. मागील साडेआठ महिन्यांत ८ हजार ९१८ नवीन दुचाकींची नागरिकांनी खरेदी केली आहे.
२,७४२ नवीन चारचाकी रस्त्यावर
मागील साडेआठ महिन्यांत वाहन खरेदी करताना वर्ध्याकरांनी दुचाकींना सर्वाधिक पसंती दर्शविली असली तरी याच साडेआठ महिन्यांच्या काळात २ हजार ७४२ नवीन चारचाकींची खरेदी नागरिकांनी केली आहे. उपप्रादेशिक परिवहनकडे रितसर नोंदणी करून ही नवीन वाहने सध्या रस्त्यांवर धावत आहेत.
मागील साडेआठ महिन्यांतील नवीन वाहन खरेदीची स्थिती-
एकूण नोंदणी : ११,७०४
- दुचाकी वाहने : ८,९१८
- तीनचाकी वाहने : ४९
- चारचाकी वाहने : २,७४२