विनाकारण हॉर्न वाजवणे ध्वनिप्रदूषण करण्याचेच कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 10:10 PM2017-09-22T22:10:32+5:302017-09-22T22:11:18+5:30
वाहनाचे हॉर्न वाजवत जाण्याची महामार्गांवरील एक पद्धत पाहिली म्हणजे म्युझकल हॉर्नने किती उग्र रूप धारण केले आहे ते लक्षात यावे. वास्तविक हॉर्नची आवश्यक तेव्हाच साद द्या, अन्यथा ध्वनिप्रदूषणाला स्वीकारा असे सांगण्याची वेळ आली आहे. केवळ दंडाच्या कारवाईने भागणार नाही, लोकांना याची समज येणे गरजेचे आहे
कार, ट्रक, बस अशा विविध वाहनांकडून महामार्गावर तर म्युझिकल हॉर्न वाजवले जाताता. विशेष राष्ट्रीय करून महामार्गांवर या हॉर्नचा आवाज रात्रीच्यावेळी तर चांगलाच घुमत असतो. खरे म्हणजे म्युझिकल हॉर्नला बंदी असूनही अनेक ट्रक, बस यांचे चालक हे हॉर्न आवर्जून बसवून घेतात,शहरामध्ये त्या हॉर्नला पोलीस पकडतील म्हमून मग त्या हॉर्नला साध्या हॉर्न मध्ये स्विचद्वारे बदलले जाते. पण पुन्हा महामार्गावर जाताच यांचे हे म्युझिकल हॉर्न वाजवायला सुरुवात होते. शहरांमध्ये कारचे काही हौशी चालक हॉर्न म्हणजे काही वाद्यच असावे अशा थाटात वाजवत असतात. वाहतुकीच्या नियमांनुसार हॉर्न कधी व कशासाठी वाजवावेत व ते कुठे वाजवू नयेत याचे काही मार्गदर्शन असते. रस्त्यावर त्या अनुषंगाने फारच कमी ठिकाणी हॉर्न वाजवू नये, यासाठी संकेत फलक लावले जातात. ते किती जण पाळतात हा भाग वेगळा. पण या ठिकाणी तरी हॉर्न वाजवले जाता कामा नयेत. मात्र तेथेही ते वाजवले जातात.
काही कार्सना डबल हॉर्न लावले जातात. अगदी कर्णकर्कश्श असणारे हे हॉर्न त्रासदायक असतात. मात्र नियमांचे पालन केले जाते का, हा पुन्हा प्रश्न उद्भवतोच. कारला वा वाहनाला हॉर्न लावण्यामागे काही हेतू होते. रस्त्यामध्ये अडचणीच्यावेळी व पादचारी, अन्य वाहनांचे चालक यांना सावध करण्यासाठी हे हॉर्न सुरू झाले. अगदी रबरी भांपूपासून इलेक्ट्रॉनिक हॉर्नपर्यंत विविध प्रकारचे हॉर्न आज बाजारामध्ये मिळतात. वास्तविक हॉर्न कोणत्या प्रकारचे उत्पादित करायचे यावरच खरे म्हणजे बंधन हवे. मात्र भारत ही बाजारपेठ झाल्याने अनेकदा नियमांना डावलून उत्पादन केले जाते, काहीवेळा काही खास ग्राहक लक्षात घेतले जातात. त्या ग्राहकांची संख्याही कमी नाही, त्यामुळे त्या प्रकारच्या हॉर्नचे उत्पादन वा आयातही केली जाते. कार लिव्हर्स घेतानाही हॉर्नचा वापर केला जातो. खरे म्हणजे हॉर्न वाजवण्याबाबत असलेले नियम लक्षात घेता दंडाचीही तरतूद केलेली आहे. वास्तविक अनावश्यक हॉर्न वाजवणे हे कर्णकर्कश्श असून त्यामुळे ध्वनिप्रदूषणही होत असते, लोकांना त्रास होतो,काहींचा रक्तदाबही वाढतो. हे सारे माणूस म्हणून प्रत्येक ड्रायव्हरने लक्षात घ्यायला हवे. दंडाची तरतूद आहेच पण त्यापेक्षा समज येणे गरजेचे आहे.