आहा...! ईव्ही वाहनांसारखेच सीएनजी कारचेदेखील आरटीओ रजिस्ट्रेशन फ्री; या सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 10:00 AM2022-05-30T10:00:05+5:302022-05-30T10:00:25+5:30
डिझेल, पेट्रोल वरील वाहने खरेदी करण्याचा कल कमी होईल आणि पर्यावरण पूरक वाहने खरेदीचा कल वाढेल अशी अपेक्षा प.बंगाल सरकारला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ईलेक्ट्रीक कार, स्कूटरचे आरटीओ रजिस्ट्रेशन फ्री करण्यात आले आहे. विविध राज्य सरकारांनी ही सूट दिलेली आहे. परंतू ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे. ईलेक्ट्रीक कार-स्कूटरला रजिस्ट्रेशन झिरो केलेच, परंतू पुढील दोन वर्षांसाठी सीएनजी कारलाही रजिस्ट्रेशन शुल्क माफ करून टाकले आहे.
1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2024 या कालावधीत खरेदी केलेल्या कोणत्याही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक मोटरसायकल, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक टू व्हीलर, इलेक्ट्रिक रिक्षा, इलेक्ट्रिक थ्री व्हीलर किंवा सीएनजी वाहनावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
यामुळे डिझेल, पेट्रोल वरील वाहने खरेदी करण्याचा कल कमी होईल आणि पर्यावरण पूरक वाहने खरेदीचा कल वाढेल अशी अपेक्षा प.बंगाल सरकारला आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. १ एप्रिलपासून आजपर्यंत ज्या लोकांनी वाहने खरेदी केली आहेत, त्यांना रजिस्ट्रेशन फी परत केली जाणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे या वाहनांची खासकरून सीएनजी वाहनांची ऑन रोड प्राईज कमी होणार आहे. बंगालमध्ये 28.5 टक्के लोकांकडे दुचाकी आहेत तर 2.8 टक्के लोकांकडे चारचाकी आहेत. राज्यात रेल्वे, बस आणि टॅक्सीमधून मोठ्या प्रमाणावर प्रवास केला जातो.