आहा, जबरदस्त मायलेजवाली इनोव्हा! १०० टक्के इथेनॉलवर चालणार, २९ ला लाँचिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 10:49 AM2023-08-25T10:49:15+5:302023-08-25T10:49:56+5:30
गेल्या वर्षी टोयोटाने हायड्रोजनवर चालणारी Toyota Mirai EV लाँच केली होती.
पेट्रोल, डिझेलवरील कार आता परवडेनाशा झाल्या आहेत. इलेक्ट्रीक कारच्या किंमतीदेखील आवाक्याच्या बाहेर आहेत. असे असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही काळापासून इथेनॉलची स्तुती करत आहेत. आपल्याकडे पुरेसे इथेनॉल उपलब्ध आहे, त्याचा वापर इंधन म्हणून केला तर इंधनाच्या किंमती कमी होतील आणि शेतकऱ्यांनाही पैसा मिळेल असे ते म्हणत होते. आता टोयोटाची १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार येत आहे.
गेल्या वर्षी टोयोटाने हायड्रोजनवर चालणारी Toyota Mirai EV लाँच केली होती. टोयोटाच्या इनोव्हाच्या लाँचिंगची घोषणा खुद्द गडकरींनीच केली आहे. २९ ऑगस्टला मी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी लोकप्रिय इनोव्हा कार लाँच करणार आहे, असे ते म्हणाले आहेत. गडकरी एका कार्यक्रमात बोलत होते.
2004 मध्ये देशात पेट्रोलच्या किमती वाढल्यानंतर आपण जैव-इंधनामध्ये रस घेण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी ब्राझीलला भेट दिली होती. जैव-इंधन चमत्कार करू शकते आणि पेट्रोलियमच्या आयातीवर खर्च होणारे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन वाचवू शकते. आम्हाला स्वावलंबी व्हायचे असेल तर ही तेल आयात शून्यावर आणावी लागेल. सध्या ती 16 लाख कोटी रुपये आहे. हे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान आहे, असे ते म्हणाले.