'ड्रिंक अँड ड्राइव्ह' करताय? तर सावधान, आता कार स्वत:हून बंद पडणार आणि स्पीडवरही नियंत्रण येणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 01:02 PM2022-09-24T13:02:55+5:302022-09-24T13:03:40+5:30
मद्यपान करून वाहन चालवणं हे जगभरातील रस्ते अपघातांमागील एक प्रमुख कारण आहे.
मद्यपान करून वाहन चालवणं हे जगभरातील रस्ते अपघातांमागील एक प्रमुख कारण आहे. बहुतेक देशांमध्ये मद्यपान करुन गाडी चालवल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे, परंतु सर्वत्र त्याची अंमलबजावणी करणं सोपं नाही. पण जर तुमची कार स्वतःच तुम्हाला दारूच्या प्रभावाखाली गाडी चालवण्यापासून थांबवत असेल तर? तंत्रज्ञानाच्या युगात काहीही शक्य आहे. नवी कार अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यामध्ये ड्रायव्हर डिटेक्शन सिस्टीम आणि अल्कोहोल इम्पेयरमेंट डिटेक्शन सिस्टीम सारख्या तंत्रज्ञानाचाही समावेश असणार आहे. अशा तंत्रज्ञानामुळे आपल्या देशात मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या रस्ते अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकतं.
अमेरिकेतील प्रत्येक कारमध्ये असणार ही टेक्नोलॉजी
2020 मध्ये अमेरिकेत दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे ११,००० हून अधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळेच अमेरिकेतील नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने (NTSB) सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये अल्कोहोल इम्पेयरमेंट डिटेक्शन सिस्टम बसवण्यास सांगितलं आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये डॉज एसयूव्ही आणि फोर्ड एफ-150 ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत सात मुलांसह एकूण नऊ जण ठार झाले होते.
अपघात रोखण्यासाठी होणार मदत
NTSB अधिकारी जेनिफर होमंडी यांनी कारमधील तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितलं. या तंत्रज्ञानामुळे भीषण अपघात टाळता येण्यासारखे आहेत. अमेरिकेत दरवर्षी खराब ड्रायव्हिंग आणि वेगामुळे होणारे हजारो अपघात टाळता आले असते, असं होमंडी यांचं म्हणणं आहे.
भारतातही होणार फायदा
भारतात 2020 मध्ये सुमारे 8,300 मृत्यू मद्यपान करुन गाडी चालवल्यामुळे झाले आहेत. मद्यपान करून वाहन चालवणे, वेगात वाहन चालवणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालवणे, वळण समजू न शकणं आणि बेजबाबदारपणे रिव्हर्सिंग ड्रायव्हिंग यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात. सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, अल्कोहोल इम्पेअरमेंट डिटेक्शन सिस्टीमचाही वापर केला तर असे रस्ते अपघात कमी होऊ शकतात.
गाडी आपोआप थांबणार
अल्कोहोल इम्पेयरमेंट डिटेक्शन सिस्टम ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरील हावभावांचे निरीक्षण करतं. मद्यधुंद ड्रायव्हरचे हावभाव ओळखून हे तंत्रज्ञान आपलं काम सुरू करतं आणि जोरात अलार्म वाजू लागतो. हे तंत्रज्ञान हळूहळू वाहनाचा वेग कमी करतं आणि वाहन थांबवतं. सध्या या तंत्रज्ञानात आणखी सुधारणा करण्याचं काम सुरू आहे.