आनंद महिंद्रांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचं केलं कौतुक, Video शेअर करत दिलं रेसिंगमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 10:38 AM2021-12-19T10:38:10+5:302021-12-19T10:38:55+5:30
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांनी केलेले हटके ट्विट्स नेमहीच चर्चेचा विषय ठरतात.
मुंबई-
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांनी केलेले हटके ट्विट्स नेमहीच चर्चेचा विषय ठरतात. नुकतंच आनंद महिंद्रांनी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचं कौतुक करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सुभाष देसाई यांनी महिंद्रा कंपनीनं आणलेल्या ई-ऑटोरिक्षाच्या लाँन्चिंगवेळी रिक्षा चालवण्याचा आनंद लुटला. रिक्षा चालवल्यानंतर त्यांनी ई-रिक्षा चालवणं खूप सोपं असल्याचंहीची प्रतिक्रिया दिली होती. आनंद महिंद्रांनी सुभाष देसाईंच्या याच कृतीची दखल घेत ट्विटरवर देसाई यांचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ देखील रिट्विट केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी सुभाष देसाई ई-ऑटोरिक्षा चालवण्याचा अनुभव घेत असतानाचा एक व्हिडिओ रिट्विट करत देसाईंच्या ड्रायव्हिंगचं कौतुक केलं आहे. तसंच त्यांना महिंद्रा रेसिंग स्पर्धेत सहभागी होण्याचं थेट निमंत्रणच देऊन टाकलं आहे. "सुभाषजी...आम्हाला तुम्ही महिंद्रा रेसिंग स्पर्धेत हवे आहात. तुम्ही लाल रंगाच्या रेसिंग सूटमध्येही रायडर म्हणून छान दिसाल", असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.
Subhashji, we need you in @MahindraRacing ! You would look great in our red racing suit as well… @Subhash_Desaihttps://t.co/WKmsVb2gvB
— anand mahindra (@anandmahindra) December 18, 2021
देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी असलेल्या Mahindra & Mahindra नेही इलेक्ट्रिक कार सादर करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, यापूर्वी Mahindra ने महाराष्ट्रात ई-रिक्षा लॉंच केली आहे. Mahindra Treo इलेक्ट्रिक रिक्षा महाराष्ट्रात लाँच करण्यात आली आहे. याची किंमत २ लाख ९ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक रिक्षावर राज्याकडून ३० हजार रुपयाची सूट दिली जाणार आहे. ३१ डिसेंबर आधी खरेदी केल्यास ३७ हजार रुपयाची सूट दिली जाणार आहे. कंपनीचा दावा आहे की, हे सीएनजीच्या तुलनेत ५ वर्षात २ लाख रुपयाची बचत करू शकते. लवकरच Mahindra Treo देशातील अन्य काही राज्यांमध्येही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.