फोक्सव्हॅगनच्या संचालकांना अटक करा; एनजीटीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:34 AM2019-01-18T06:34:14+5:302019-01-18T06:34:17+5:30
नवी दिल्ली: गेल्या नोव्हेंबरमध्ये दिलेल्या आदेशानुसार शुक्रवार संध्याकाळपर्यंत १०० कोटी जमा न केल्यास फोक्सव्हॅगन कंपनीच्या संचालकांना अटक करण्याचा इशारा ...
नवी दिल्ली: गेल्या नोव्हेंबरमध्ये दिलेल्या आदेशानुसार शुक्रवार संध्याकाळपर्यंत १०० कोटी जमा न केल्यास फोक्सव्हॅगन कंपनीच्या संचालकांना अटक करण्याचा इशारा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) गुरुवारी दिला.
मोटारींच्या धूरातून नायट्रस आॅक्साईड या प्रदूषणकारी पदार्थाचे कायद्याने संमत केलेल्या प्रमाणाहून जास्त उत्सर्जन होत असतानाही ते कमी दाखविले जाईल, अशी यंत्रणा मोटारींच्या इंजिनात बसवून फसवणूक करण्याचा घोटाळा झाल्याची फोक्सव्हॅगनने तीन वर्षांपूर्वी कबुली दिली होती. त्यानंतर भारतातही कंपनीच्या वाहनांतून होणाऱ्या उत्सर्जनाची तपासणी झाली. त्यात या कंपनीच्या वाहनांतून विषारी द्रव्याच्या उत्सर्जनाचे प्रमाण तब्बल पाच ते नऊपट अधिक असल्याचे निष्पन्न झाले होते.
कंपनीच्या हानीकारक वाहनांच्या भारतातील विक्रीवर बंदी घालावी, यासाठी एनजीटीकडे याचिका करण्यात आल्या. त्यात एनजीटीने कंपनीच्या वाहनांच्या तपासणीसाठी एक तज्ज्ञ समिती नेमून हमी म्हणून कंपनीने १०० कोटी रुपये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे महिनाभरात जमा करावे, असा आदेश १६ नोव्हेंबर रोजी दिला होता.
सर्वोच्च न्यायालायनेही हा आदेश कायम ठेवून मुदत वाढविण्यास नकार दिला होता. तरीही कंपनीने रक्कम जमा केली नाही म्हणून शेवटची संधी देत न्यायाधिकरणाने वरील इशारा दिला.