जग-दुनिया इलेक्ट्रीक वाहनांकडे धावतेय, पॅरिसमध्ये ई स्कूटर बंद करण्यासाठी मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 14:58 IST2023-04-03T14:57:55+5:302023-04-03T14:58:20+5:30
ई स्कूटरबाबत लोकांच्या मनात प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्य़ा दुर्घटनांमुळे ई स्कूटरविरोधात लोकांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे.

जग-दुनिया इलेक्ट्रीक वाहनांकडे धावतेय, पॅरिसमध्ये ई स्कूटर बंद करण्यासाठी मतदान
अवघे जग इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रीक गाड्यांच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहे. असे असताना पॅरिसमध्ये ई स्कूटर बंद करण्यासाठी नागरिकांनी मतदान केले आहे. फ्रान्सच्या राजधानीतील ही घटना पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार पॅरिसमध्ये या स्कूटरचा वापर लवकरच थांबविला जाण्य़ाची शक्यता आहे. ई स्कूटरबाबत लोकांच्या मनात प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्य़ा दुर्घटनांमुळे ई स्कूटरविरोधात लोकांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी पॅरिसमध्ये ईलेक्ट्रीक स्कूटर बंद करण्यावरून मतदान झाले होते. यामध्ये ८९ टक्के लोकांनी ई स्कूटरविरोधात मतदान केले आहे.
या इलेक्ट्रीक स्कूटरमुळे पॅरिसमध्ये सतत अपघात, दुर्घटनांची संख्या वाढत आहे. यामुळे याविरोधात झालेल्या मतदानामुळे लवकरच शहरात ईलेक्ट्रीक स्कूटरचा वापर थांबविला जाऊ शकतो. इलेक्ट्रिक स्कूटर अपघातातील पीडितांचे प्रतिनिधीत्व रणाऱ्या अपाकौवी चॅरिटीचे सह-संस्थापक अरनॉड किलबासा यांनी आनंद व्य़क्त केला आहे. पॅरिसचे लोकही आनंदी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यासाठी आम्ही चार वर्षांपासून लढा देत आहोत. सर्व पॅरिसच्या लोकांचे फुटपाथवरून चालताना जीव धोक्यात असतात. रस्ता ओलांडताना देखील चिंता सतावत असते. चालताना चोहोबाजुंना लक्ष ठेवण्याची गरज असते. यामुळे रस्त्याने चालताना कठीण होऊन बसले होते, असे ते म्हणाले.
अराजक स्वभावाचे लोक या स्कूटर पॅरिसच्या रस्त्यांवर धोकादायक पद्धतीने चालवितात. या निर्णयाचा आपल्याला फटका बसणार आहे, असे ई स्कूटर कंपन्यांचे म्हणणे आहे. पॅरिसमध्ये १२ वर्षांच्या मुलांनाही ई स्कूटर चालविण्याचा अधिकार आहे. यामुळे रस्ते अपघातात वाढ झाली आहे.