आधीच मंदी, त्यात कर्मचाऱ्यांनी केली कामबंदी; Ashok Leyland अडकली कात्रीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 02:12 PM2019-08-19T14:12:01+5:302019-08-19T14:16:30+5:30
अशोक लेलँड ट्रक, टेम्पो, बससारखी अवजड वाहने बनविते.
नवी दिल्ली : ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सध्या मंदीचे जोरदार वारे सुरू आहेत. गेल्या 20 वर्षांतील मोठी मंदी असल्याचे बोलले जात आहे. मारुती सुझुकीनेही खर्चात कपात करण्यासाठी तीन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. टाटा मोटर्सनेही उत्पादनात कपात करण्यासाठी काही दिवस कंपनी बंद ठेवली होती. आता यानंतर आणखी एका भारतीय कंपनीचा नंबर लागला आहे.
अशोक लेलँड ट्रक, टेम्पो, बससारखी अवजड वाहने बनविते. मात्र, मंदीचा फटका या क्षेत्रालाही बसला आहे. यामुळे कंपनीने कार्यकारी स्तरावरील कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. कंपनीने ही योजना अशावेळी आणली आहे, जेव्हा मंदी आणि त्यांचे कर्मचारी बोनस वाढविण्यासाठी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन करत आहेत.
अशोक लेलँडच्या कर्मचारी संघटनेच्या सुत्रांनी सांगितले की, आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे. मॅनेजमेंटने सोमवारपर्यंत कारखान्यात काम बंद केले आहे. कंपनीचे संचालक मंडळ आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.
कंपनीच्या कामगार संघटनेने बोनसमध्ये 10 टक्क्यांची वाढ मागितली आहे. तर कंपनी 5 टक्के वाढ देण्यास तयार आहे. दरम्यान, हिंदूजा समुहाच्या या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी एक नोटीस जाहीर करत स्वेच्छा निवृत्तीची योजना किंवा ईएसएसची योजना दिली आहे. सुत्रांनुसार जे कर्मचारी व्हीआरएससाठी बसत नसतील तर त्यांच्यासाठी ही ईएसएस योजना आहे.
ऑटो इंडस्ट्री मंदी आणि बीएस 6 च्या कचाट्यात सापडली आहे. पंतप्रधान मोदींनी नुकतेच या कंपन्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू ठेवल्याचे दिसत आहे. ऑटो सेक्टरने 2000 मध्ये यापेक्षा मोठ्या मंदीचा सामना केला होता.
मारुतीचे अध्यक्ष भार्गव यांना मारुती सुझुकीने केलेल्या कामगार कपातीवर प्रश्न करण्यात आला होता. यावेळी त्यांनी होकार देत तीन हजार कर्मचाऱ्यांना कमी केल्याचे सांगितले. ऑटोमोबाईल सेक्टर अर्थव्यवस्थेमध्ये अनेक नोकऱ्या निर्माण करतो. विक्री, सेवा, इन्शुरन्स, लायसन्स, फायनान्स, अॅक्सेसरीज, ड्रायव्हर, पेट्रोल पंप आणि ट्रान्सपोर्टेशन यामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या प्रभावित असणार आहेत. कल्पने पलिकडे या क्षेत्राला मोठा फटका बसणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.