मोटारसायकलला लावण्यासाठीच्या आकर्षक बॅगा जुन्या व नव्याचा संगमच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 11:39 AM2017-10-03T11:39:42+5:302017-10-03T11:44:04+5:30
मोटारसायकलीला बाजूला स्टील वा अॅल्युमिनियमचे बॉक्स लावण्याची साधारण बाब. उपयुक्तता असली तरी त्यात नावीन्य शोधले जाते हे खरेच. मोटारसायकलीला चामड्याच्या वा त्यासारख्या अन्य सामग्रीचा वापर करून तयार केलेल्या साइडबॅग्स सध्या वापरल्या जात आहेत. नव्या व जुन्या आरेखनाचा तो एक चांगला मेळच आहे.
अनेकदा जुन्याचा व नव्याचा एक संगम करण्याचा माणसाचा प्रयत्न असतो. पारंपरिकता जोपासण्याचा भाग म्हणा वा पारंपरिक व जुन्या काळामध्ये असलेल्या चांगल्या व आकर्षक बाबी पुन्हा नव्या काळामध्ये आणण्याचा प्रयत्न म्हणा पण त्यातून नावीन्यपूर्णताही साधली जाते. मोटारसायकलींमध्ये अनेकदा असे आरेखन पाहायला मिळते.एनफिल्डसारखी मोटारसायकल त्यामुळेच जुन्या पद्धतीच्या आरेखनामधून साकारलेली आहे, नव्या आरेखनाचाही समावेश असलेली आहे. अशा प्रकारच्या अन्य कंपन्यांच्याही मोटारसायकली वापरण्याची सध्या चांगलीच क्रेझ आहे.
त्या मोटारसायकलींना नव्यापेक्षा जुन्या पद्धतीच्याही काही साधनसामग्रींद्वारे आकर्षक करण्याचा प्रयत्न होत असतो. त्या जुन्या आरेखनासारख्या व नव्यामधील मेळ घालून तयार केलेल्या वस्तू मोटारसायकलीला चांगलेच रूप देत असतात. अर्थात नव्या काळातील युवकांना आकर्षित करतील अशा आरेखनाच्या मोटारसायकलींना जुन्या व नव्याचा मेळ असणारी साधनसामग्री फारशी लावली जात नाही. मात्र एक खरे की काहीवेळा तशी रचनाही नव्या मोटारसायकींना शोभून दिसते.
मोटारसायकलींना पूर्वी चामड्याच्या बॅगा मागील बाजूला अटकवल्या जात, तसेच त्या पुढील बाजूला मोटारसायकलीच्या पेट्रोलटॅंकवर पसरवून ठेवण्याचीही एक फॅशन त्या काळात होती. ती कशासाठी होती माहिती नाही. मात्र मागील बाजूस डाव्या व उजव्या अंगाला मोटारसायकलीचे सलामान ठेवण्यासाठी असलेले रफटफ असे ते आरेखन होते. मोटारसायकलीच्या मागील कॅरियरसारख्या भागातही गोल करून वळकटीसारखी दिसणारी रचना सामानासाठी वापरली जात असे. या प्रकारच्या आरेखनाला उजाळा मिळालेला सध्या दिसतो. काही जास्त ताकदीच्या मोटारसायकलींना अशी आरेखन असमारी साधनसामग्री लावणे हे अँटिक पद्धतीचे मानले जाते. मात्र तीच रचना आजच्या अनेक तरुणांच्या मनात घर करून राहिलेली दिसते. मोटारसायकलींच्या मागे लावल्या जाणाऱ्या या बॅगा लोखंडी वा अॅल्युमिनीयम बॉक्सपेक्षा खूप वेगळ्या आहेत. दिसण्यामध्येही वेगळ्या आहेत व उपयोगामध्ये आगळ्या आहेत.
परदेशातून भारतात येणाऱ्या व विशेष करून येथे आल्यानंतर मोटारसायकलीवरून हिंडणाऱ्या परदेशी पर्यटकांनी या प्रकारच्या रचनेच्या बॅगा वापरण्यास सुरुवात तेली होती. त्यानंतर त्या भारतातील अनेक भागात बहुधा मनात ठसल्या गेल्या असाव्यात नंतर त्या प्रकारच्या दोन्ही बाजूला असलेल्या साईड बॅगांसाठी विविध प्रकारची डिझाइन्स तयार केली गेली असावीत. त्यातून रफटफ वाटणारे पण नव्या पॉलिशचे डिझाईन, शाळेच्या दफ्तरासारऱखी रचना असो वा वळकटीसारखी रचना असो.
त्या प्रकारच्या रचनेमध्ये अॅटिक व नवीन जमान्यातील वैशिष्ट्ये वापरून या बॅगा बाजारपेठेत दिसतात. किंबहुना एक आगळा लूक यामुळे मोटारसायकलीला मिळतो. त्याला कुलूप वगैरे काही नसते. मात्र तरीही त्या बॅगा वापरण्याची पद्धत अनेक तरुणांनी आपल्या मोटारसायकलीसाठी स्वीकारलेली आहे. हीच अँटिक लूकची रचना नव्या पिढीकडून सध्या जोपासली जात आहे. विशेष करून जास्त ताकदीच्या दणकट मोटारसायकलींना ती अधिक शोभूनही दिसते, हेच त्या आरेखनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.