पोलिसांनी रिक्षाचालकाचं फाडलं 18 हजारांचं चलन; धक्क्याने रिक्षा चालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 02:35 PM2019-09-26T14:35:22+5:302019-09-26T14:55:59+5:30
सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यामुळे एकाला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे.
उत्तर प्रदेश: नवीन मोटार वाहन कायद्यानूसार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या प्रमाणात दंड आकरण्यात येत आहे. नवीन कायदा लागू करण्यात आल्यानंतर विविध घटना घडल्याचे देखील समोर आले आहेत. मात्र आता सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यामुळे एकाला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे.
नवीन मोटार कायद्यानुसार उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये गणेश अग्रहारी या रिक्षा चालकावर वाहतूकीचे नियम मोडल्यामुळे कारवाई करत 18 हजार रुपयांचे चलन फाडण्यात आले होते. यानंतर गेले कित्येक दिवस गणेश सदम्यात गेल्याने त्यांना स्थानिक जिल्ह्यातील रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु तब्यतेत काही सुधारणा होत नसल्याने त्यांना वाराणसीच्या रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान गणेश यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान 31 ऑगस्ट रोजी आरटीओच्या विभागाने ऑटोचे कागदपत्र न दाखविल्यामुळे 18 हजार 500 रुपयांचे चलन फाडले होते. त्यामुळे मोठी रक्कम दंड म्हणून आकारण्यात आल्यामुळे गणेश अग्रहारी यांचा मृत्यू झाला असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. गणेशच्या मृत्यूला कुटुंबाने सरकारला जबाबदार मानले आहे.
देशात नवीन मोटार वाहन कायदा 1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालविणारे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी नवीन मोटार वाहन कायद्यात दंडाची रक्कम दहापटीने वाढविण्यात आली आहे.