Auto Expo 2018 : जाणून घ्या काय खास असेल यावेळच्या 'ऑटो एक्सपोमध्ये'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 09:28 AM2018-02-07T09:28:15+5:302018-02-07T09:51:26+5:30
द मोटर शो 2018' च्या 14 व्या मोसमाची आजपासून सुरुवात होणार आहे. आशियातील हा सर्वात मोठा ऑटो एक्सपो आहे.
नवी दिल्ली - 'द मोटर शो 2018' च्या 14 व्या मोसमाची आजपासून सुरुवात होणार आहे. आशियातील हा सर्वात मोठा ऑटो एक्सपो आहे. ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्सपो मार्टमध्ये 14 फेब्रुवारीपर्यंत हा ऑटो एक्सपो चालणार आहे. आठ ते 11 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीच्या प्रगती मैदानावर ऑटो पार्ट्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ऑटो एक्सपोमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या गाडया पाहण्याची संधी मिळणार असल्याने सर्वसामान्यांमध्ये बरीच उत्सुक्ता आहे.
काय असेल खास
यंदाच्या ऑटो एक्सपोमध्ये 24 नव्या गाडया लाँच होतील. या एक्सपोमध्ये 100 स्टॉल्स असणार आहेत. मागच्यावेळी 88 स्टॉल्स होते. अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी दिली.
विशेष म्हणजे मागच्यावर्षी एक्सपोमध्ये 11 स्टार्ट-अप कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी फक्त दोन कंपन्या सहभागी होणार आहेत. एसीएमएम, सीआयआय आणि सियाम या तिघांनी मिळून संयुक्तपणे ऑटो एक्सपो : द मोटर शो 2018 चे आयोजन केले आहे. या शो ला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मोटर व्हेइकल मॅन्युफॅक्चर्स संघटनेची मान्यता आहे.
आठ लाखापेक्षा जास्त लोक या ऑटो एक्सपोमध्ये सहभागी होतील अशी शक्यता आहे. सर्वसामान्य 9 ते 14 जानेवारी दरम्यान सहभागी होऊ शकतात. या शो मध्ये 36 पेक्षा जास्त ऑटोमेकर्स आपल्या गाडया, एसयूव्ही, टू व्हीलर आणि कमर्शिअल वाहने प्रदर्शनासाठी मांडणार आहेत. इलेक्ट्रीक वाहने या ऑटो एक्सपोचे खास वैशिष्टय असेल.
या ऑटो एक्सपोत बिझनेस अवर्समध्ये तिकीटाचे दर 750 रुपये आहेत. पब्लिक अवर्समध्ये तिकिटाची किंमत 350 रुपये आहे. बिझनेस अवर्स सकाळी 10 ते 1 पर्यंत असेल तर पब्लिक अवर दुपारी 1 ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असेल. वीकएण्डला तिकिटाची किंमत 475 रुपये आहे.