जगातील सर्वात मोठ्या कंपनीला मदतीला घेतले तरी मागणी संपेना...; मारुतीच्या 3.69 लाख कार वेटिंगवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 02:39 PM2023-03-06T14:39:40+5:302023-03-06T14:39:57+5:30
ऑटो एक्सपोमध्ये, मारुतीने त्यांच्या दोन अन्य SUV जिमनी आणि फ्रॉन्स देखील दाखविण्यात आल्या होत्या. त्या लाँच झाल्या की ग्राहक या कारवरही तुटून पडणार आहेत.
मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी आहे. तर टोयोटा ही जगातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी आहे. असे असले तरी दोन्ही मिळून भारतीयांची मागणी पूर्ण करू शकत नाहीएत. मारुतीच्या तब्बल 3.69 लाख कार वेटिंगवर आहेत. सेमीकंडक्टरमुळे मारुतीला ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यास अपयश येत आहे.
सेमीकंडक्टरची टंचाई पुढील काही तिमाही सुरुच राहील असा अंदाज आहे. यामुळे काही मॉडेलच्या उत्पादनात तूट येईल आणि या गाड्यांचे वेटिंग आणखी वाढेल अशी स्थिती आहे. म्हणजेच मारुतीच्या ग्राहकांना कारसाठी खूप काळ वाट पहावी लागणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकीकडे सुमारे 3.69 लाख कारची बुकिंग आहे. कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या MPV Maruti Ertiga ची सर्वाधिक ऑर्डर आहे. कंपनीकडे या MPV च्या सुमारे 94,000 कारची ऑर्डर प्रलंबित आहे, तरी देखील बुकिंग वाढत आहे. ग्रँड विटारा आणि ब्रेझा सारख्या नव्या गाड्यांनाही मागणी वाढत आहे. विटाराला 37,000 आणि ब्रेझाला 61,500 बुकिंग आहे.
ऑटो एक्सपोमध्ये, मारुतीने त्यांच्या दोन अन्य SUV जिमनी आणि फ्रॉन्स देखील दाखविण्यात आल्या होत्या. त्या लाँच झाल्या की ग्राहक या कारवरही तुटून पडणार आहेत. असे झाले तर मारुतीकडचा ऑर्डरचा आकडा पाच लाखांवर गेल्यास नवल वाटू नये. एवढी मागणी असली तरी मारुतीने टोयोटासोबत प्लॅटफॉर्म शेअर केला आहे. टोयोटादेखील मारुतीच्या गाड्या बनवून आपल्या नावावर विकत आहे. दोन्ही कंपन्या एकमेकांच्या कार आपल्या फॅक्टरीमध्ये बनवत आहेत. तरी देखील ही मागणी पुरविताना दोन्ही कंपन्यांना नाकीनऊ येत आहेत.
पीटीआयनुसार मारुतीने गेल्या तिमाहीमध्ये 46,000 कार कमी बनविल्या आहेत. सेमीकंडक्टर नसल्याने मारुतीला उत्पादन कमी करावे लागले आहे. यामुळे देखील वेटिंगमध्ये फुगवटा दिसत आहे. परिस्थिती कधी सुधारेल हे सीनियर एक्जीक्यूटिव ऑफिसर (मार्केटिंग एंड सेल्स) शशांक श्रीवास्तव देखील सांगू शकलेले नाहीत.