ऑटोमोबाइल क्षेत्राला मंदीचा फटका; आतापर्यंत 15 हजार जणांनी नोकऱ्या गमावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 09:11 PM2019-08-13T21:11:47+5:302019-08-13T21:12:21+5:30
गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदीचे ढगही दाटू लागले आहेत.
नवी दिल्ली/मुंबई : गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदीचे ढगही दाटू लागले आहेत. गेल्या 19 वर्षांत पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रात अशा प्रकारची मंदी आहे. या मंदीमुळे दोन ते तीन महिन्यांत जवळपास 15 हजार जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. ऑटो इंडस्ट्रीनं प्रसिद्ध केलेल्या 'SIAM'च्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्र 3.7 कोटी जणांना रोजगार उपलब्ध करून देते. ऑटोमोबाइल क्षेत्रातील ही मंदी संपुष्टात न आल्यास आणखी काही जणांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची चिन्हे या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहेत. ऑटोमोबाइल क्षेत्रात जीएसटीचे दर 28 टक्के आहेत, ते दर तात्काळ 18 टक्क्यांवर आणायला हवेत, अशी मागणी ऑटो इंडस्ट्रीकडून करण्यात आली आहे. जुलै 2018 ते 2019 यादरम्यान आर्थिक क्षेत्रातल्या म्युच्युअल फंडांची गुंतवणूकही 64 हजार कोटींनी घटली आहे. वाहन क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे गेल्या आठवड्यात टाटा मोटर्सने उत्पादन थांबविल्याने खळबळ माजलेली असताना आता भारताची सर्वात मोठी कंपनी मारुतीनेही 1000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे या मंदीचा विळखा वाढू लागल्याचे संकेत मिळत आहेत.
या अहवालात गाड्यांची एकूण विक्री, प्रवासी गाड्या, दुचाकींची विक्री यांचाही समावेश करण्यात आला आहे. 2018 मध्ये या गाड्यांची विक्री 22 लाख 45 हजार 224 एवढी झाली होती. परंतु तीच यंदा फक्त 18 लाख 25 हजार 148च्या नीचांकी पातळीवर आहे. 19 वर्षांनंतरची सर्वात मोठी मंदी आली असल्याचंही फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा)नं अहवालातून सांगितलं आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने, शोरुमही बंद होऊ लागले
मारुती सुझुकीने नेक्सा आणि अरिना या ब्रँडखाली कार विक्री दालने उघडली होती. मध्यम वर्गाला आकर्षित करण्याचा हा प्रयत्न होता. बलेनो, इग्निस, सियाझ, एस क्रॉस अशा कार या दालनांमधून कंपनी विकत होती. मात्र, विक्री घटल्याने डीलरना ही दालने बंद करावी लागली आहेत. तुर्भेतील नेक्साचा शोरूम याच कारणामुळे बंद करण्यात आला आहे. तर मारुतीने सेकंड हँड कारच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले होते. ट्रू व्हॅल्यू या नावे त्यांनी वापरलेल्या कारची विक्री सुरु केली होती. मात्र, नवीन कारसोबत जुन्या कारची विक्रीही मंदावल्याने कर्मचाऱ्यांचे पगार काढणेही कंपनीला अवघड बनले होते. या कर्मचाऱ्यांचे पगार 20 दिवस उशिराने केले जात आहेत.