AutoExpo2018 : कार नव्हेच, तो असेल ‘रोबो’; कन्सेप्ट गाड्यांनी दाखविली दुनिया न्यारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:19 AM2018-02-10T02:19:44+5:302018-02-10T02:19:51+5:30
आधुनिक युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन तर आला पण स्मार्ट गाड्या आल्या तर... हो अशा गाड्या भारतातही येऊ घातल्या आहेत. मात्र त्या गाड्या नसून तो एकप्रकारे ‘रोबो’च असेल. अशा या कन्सेप्ट गाड्यांची न्यारी दुनिया आॅटो एक्स्पो २०१८ मध्ये अनुभवयास येते.
- चिन्मय काळे
ग्रेटर नोएडा : आधुनिक युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन तर आला पण स्मार्ट गाड्या आल्या तर... हो अशा गाड्या भारतातही येऊ घातल्या आहेत. मात्र त्या गाड्या नसून तो एकप्रकारे ‘रोबो’च असेल. अशा या कन्सेप्ट गाड्यांची न्यारी दुनिया आॅटो एक्स्पो २०१८ मध्ये अनुभवयास येते.
मोबाईल तंत्रज्ञान बाजारात आले तेव्हा साºयांनाच त्याचे अप्रुप होते. मोबाईल बाळगणे ‘स्टेटस सिम्बॉल’ झाले होते. पुढे मोबाईलचे नवनवीन तंत्रज्ञान बाजारात आले. यातील सर्वात अत्याधुनिक म्हणजे स्मार्टफोन. हे स्मार्टफोन ‘आर्टीफिशीअल इंटेलिजन्स’ (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धीमतेवर आधारित आहेत. ही कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून रोबोच आहे. अशा रोबो गाड्या ग्रेटर नोएडात सुरू असलेल्या आॅटो एक्स्पोचे वैशिष्ट्य ठरले. कुठल्याही कंपनीला नवीन गाडी बाजारात सादर करण्यासाठी आॅटो एक्स्पो हा सर्वोत्तम मंच असतो. विविध आॅटोमोबाईल कंपन्या दरवर्षी या प्रदर्शनात नवनवीन मॉडेल सादर करीत असतात. यंदाही असा एक्सपो शुक्रवारपासून सुरू झाला. १४ फेब्रुवारीपर्यंत चालणाºया या प्रदर्शनात ३० कंपन्यांनी त्यांच्या २५० हून अधिक नवीन प्रकारच्या गाड्या सादर केल्या. यंदा मात्र सामान्य गाड्यांच्या लॉन्चिंगचे कौतूक या एक्स्पोत दिसून येतच नाही. याचे कारण कन्सेप्ट कार्स. या कन्सेप्ट कार्सने सर्वसामान्या गाड्यांवर कुरघोडी करीत सर्व गर्दी स्वत:कडे आकर्षित केली. ‘एआय’ वर आधारित कन्सेप्ट गाड्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यांत गिअर नाही. गाडीतील चालक बसण्याची जागा म्हणजे जणू काही विमानाचे कॉकपिटच. सर्वसामान्या गाड्यांच्या स्टीअरींगऐवजी विमानाच्या सुकाणूसारखेच याला एक हॅण्डल असते. गाडीला कुठे न्यायचे, किती वेग ठेवायचा, कुठे वळायचे, गाडीतील तापमान किती असावे, ब्रेक कधी दाबायचा अशा नानावीध कमांड चालक गाडीला देत नसून गाडीच चालकाला देते. या सर्व कमांड गाडीच्या डॅशबोर्डवर येतात. यामुळेच गाडीचा हा डॅशबोर्डसुद्धा साधासुधा नसून एखाद्या कम्प्युटरच्या स्क्रीनसारखा. गाडीला सुरुवातीला सांगा कुठल्या मार्गाने जायचे आहे, ती गाडीच तुम्हाला इच्छित स्थळी घेऊन जाईल. हे सारे काही ‘सुपर आर्टीफिशीअल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेले आहे. अर्थातच या सर्व गाड्या पेट्रोल किंवा डिझेल इंधनाच्या नसून इलेक्ट्रीक बॅटरीवर आधारित आहेत. भारतीय आॅटोमोबाईल बाजारात असलेल्या सर्वच प्रमुख कंपन्यांनी अशा कन्सेप्ट कार्स सादर केल्या आहेत.
मर्सिडिज बेन्झसारख्या लक्झरी कार्स श्रेणीतील कंपनीनेही या एक्स्पोत पहिल्यांदाच इलेक्ट्रीक श्रेणीत येताना पूर्णपणे टचवर आधारित अशी ‘इक्यू’ ही गाडी सादर केली.
मारुती-सुझुकीची सर्व्हायव्हर असेल अथवा टाटांची एच५एक्स आणि एच४एक्स, दरवाजे व बोनेटसह संपृूर्ण छत एका क्लिववर उघडले जाणारी रेनॉची ट्रीझर, बीएमडब्ल्यूची आय८ रोडस्टार, ह्युंदाईची आयोनिक, कोरियन किआ कंपनीची एसपी ही एसयूव्ही. अशा जवळपास सर्वच कंपन्यांच्या कन्सेप्ट कार्सचा आॅटो एक्स्पोत बोलबाला आहे.
चालकही हवेत प्रशिक्षित : ‘सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा आहे, हे नक्की. त्यावर आधारितच कन्सेप्ट तयार झाल्या आहेत. या गाड्या येत्या काही वर्षात भारतात येतील अथवा नाही, पण त्या आल्या तरी रस्त्यावर धावणे सोपे नसेल. कारण या गाड्या चालविण्यासाठी सर्वसामान्य चालक कामाचे नाहीत. स्मार्ट मोबिलिटीच्या स्मार्ट गाड्यांसाठी स्मार्ट चालकांची गरज आहे. या गाड्या पूर्णपणे कमांडआधारित असल्याने चालकांना त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. युरोपसारख्या ठिकाणीही या गाड्या अद्याप रस्त्यावर येऊ शकलेल्या नाहीत.’
- रोलॅण्ड फोगर, सीईओ, मर्सिडीज बेन्झ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड