Video: आधी आहेत त्याच झेपेनात, ओलाने आणली सेल्फ ड्रायव्हिंगवाली ईलेक्ट्रीक स्कूटर, ती पण टेकू देऊन...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 04:50 PM2024-04-01T16:50:15+5:302024-04-01T16:50:28+5:30
Ola Solo Video: १ एप्रिलला कंपनीने जगातील पहिलीच असा दावा करत सेल्फ ड्राईव्ह ऑटोनॉमस ओला ईलेक्ट्रीक स्कूटरची झलक दाखविली आहे.
ओलाने ईलेक्ट्रीक वाहनांवरील सबसिडीचा मार्चमध्ये भरपूर फायदा उठविला आहे. जवळपास ५५ हजार इलेक्ट्रीक स्कूटर या महिन्यात ओलाने विकल्या आहेत. आता १ एप्रिलला कंपनीने जगातील पहिलीच असा दावा करत सेल्फ ड्राईव्ह ऑटोनॉमस ओला ईलेक्ट्रीक स्कूटरची झलक दाखविली आहे. कंपनीने या स्कूटरचे नाव ओला सोलो असे ठेवले आहे.
कंपनीने काही वेळापूर्वीच रजिस्टर ग्राहकांना तसेच न झालेल्या ग्राहकांना देखील या स्कूटरचा मेल पाठविला आहे. यामध्ये व्हिडीओची लिंकही देण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये कंपनीचे काही इंजिनिअर या स्कूटरबाबत सांगताना दिसत आहेत.
तसेच व्हिडीओमध्ये ही स्कूटर गाजर संपले तर बाजारातून चालकाशिवाय गाजरही आणताना दिसत आहे. तसेच तुम्ही कुठे पार्क केली असेल तर ती आपोआपच तुमच्या मागे तुम्हाला रिसिव्ह करण्यासाठी येताना दाखविण्यात आली आहे. तसेच चार्जिंग संपत आले असेल तर ती आपणहूनच चार्जिंग स्टेशन शोधताना व पार्क होताना दाखविण्यात आली आहे.
एप्रिल फुलच्या दिवशी कंपनीने हा व्हिडीओ जारी केला आहे. यात कंपनीने जगातील पहिलीच असा दावा करत सेल्फ ड्राईव्ह ऑटोनॉमस ओला ईलेक्ट्रीक स्कूटर असल्याचा दावा केला आहे. तसेही ओलावर हजारो ग्राहकांनी फसविल्याचा आरोप केला आहे. यात स्कूटरला अनेक समस्य़ा असल्याचेही आरोप केलेले आहेत. अनेक ठिकाणी तर ओलाचे एक्सपिरिअंस सेंटर या नावाने उघडलेले शोरुमनाही संतापलेल्या ग्राहकांनी टाळे ठोकण्यास भाग पाडलेले आहे.
इथे पहा व्हिडीओ... क्लिक करा...
अशातच ओलाने जो सेल्फ ड्राईव्ह स्कूटरचा व्हिडीओ जारी केला आहे त्यात या स्कूटरला टेकू देणारे छोटे चाक असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत ही स्कूटर स्वत:ला बॅलन्स करताना दिसत आहे, तसेच आपणहूनच पुढे-मागे जाताना दिसत आहे. यामुळे आधीच्याच स्कूटर चांगल्या देता येईनात, सर्व्हिस चांगली देता येईना आणि आता ओला नवीन टेक्नॉलॉजी दाखवून लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न तर करत नाहीय ना, असा प्रश्न काही लोकांच्या मनात उपस्थित होत आहे.