Ola ला Bajaj चा धोबीपछाड! पहिला नंबर गमावला; दोन्ही कंपन्यांच्या स्कूटरमध्ये समस्याच समस्या पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:22 IST2025-01-02T11:21:53+5:302025-01-02T11:22:22+5:30
EV Two Wheeler Sales: ओलाच्या स्कूटरच्या समस्यांमुळे ओला बॅकफुटवर चालली आहे. तर बजाज चेतकचेही काही वेगळे नाहीय. नादुरुस्त स्कूटर एकदा का सर्व्हिस सेंटरला गेली की ती कित्येक दिवस ग्राहकाला परत मिळत नाहीय, अशी बजाज कंपनीचा अवस्था आहे.

Ola ला Bajaj चा धोबीपछाड! पहिला नंबर गमावला; दोन्ही कंपन्यांच्या स्कूटरमध्ये समस्याच समस्या पण...
ईलेक्ट्रीक मार्केटमध्ये उतरल्यापासून सातत्याने पहिल्या क्रमांकावर असलेल्या ओला ईलेक्ट्रीकला सरत्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात जोरदार धक्का बसला आहे. बजाजच्या चेतकने ओला ईलेक्ट्रीकला दुसऱ्या क्रमांकावर येण्यास भाग पाडले आहे. ओलाच्या स्कूटरच्या समस्यांमुळे ग्राहक वैतागलेले आहेत, याचा फटका ओलाला बसला आहे. केंद्राच्या संस्थांनीही ग्राहकांच्या तक्रारींवरून ओला कंपनीला नोटीस पाठविल्या आहेत. तसे पहायला गेल्यास बजाज चेतकचेही ग्राहक स्कूटरमधील समस्या, सर्व्हिसमुळे त्रस्त आहेत. परंतू, तरीही ग्राहकांनी बजाजवर विश्वास दाखविला आहे.
ओलाच्या स्कूटरच्या समस्यांमुळे ओला बॅकफुटवर चालली आहे. तर बजाज चेतकचेही काही वेगळे नाहीय. नादुरुस्त स्कूटर एकदा का सर्व्हिस सेंटरला गेली की ती कित्येक दिवस ग्राहकाला परत मिळत नाहीय, अशी बजाज कंपनीचा अवस्था आहे. अगदी पुण्यातही बजाज कंपनी सर्व्हिस वेळेत देऊ शकत नाहीय. सामान्य सर्व्हिसचाही लोड कंपनीला पेलवत नाहीय. अशातच चेतक आता कात टाकत आहे. टच स्क्रीन, थोडी लांबीला मोठी अशी नवीन चेतक बाजारात येत आहे. याचाही फायदा कंपनीला होताना दिसणार आहे.
डिसेंबर २०२४ मधील ईलेक्ट्रीक स्कूटर विक्रीत बजाज चेतकने पहिला क्रमांक पटकावला आहे. या महिन्यात चेतकचा मार्केट शेअर २ टक्क्यांनी वाढून २५ टक्के झाला आहे. तर ओलाचा २४ टक्क्यांवरून घटून १९ टक्के झाला आहे. वाहन पोर्टलच्या आकडेवारीनुसार एथरने देखील चांगले प्रदर्शन केले आहे. ११ वरून या कंपनीचा वाटा १४ टक्के झाला आहे. टीव्हीएसचा वाटा २३ टक्के स्थिर राहिलेला आहे.
डिसेंबरमध्ये ७३३१६ ईलेक्ट्रीक स्कूटर विकल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा ही विक्री ३ टक्क्यांनी घटली आहे. ओला ईलेक्ट्रीकने १३७६९ स्कूटर विकल्या आहेत. ही विक्री गेल्या वर्षीच्या डिसेंबर पेक्षा ५५ टक्क्यांनी कमी आहे. टीव्हीएसने १७२१२ स्कूटर विकत ४० टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. बजाजने ७५ टक्के वाढीसह १८२७६ स्कूटर विकल्या आहेत. एथरने ५९ टक्के वाढीसह १०२२१ स्कूटर विकल्या आहेत.