गाडीचा इन्शुरन्स काढायचाय? आधी हे वाचा...नाहीतर पश्चाताप होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 04:57 PM2018-10-10T16:57:47+5:302018-10-10T16:58:38+5:30
गाडीचा इन्शुरन्स काढणे म्हणजे एक मोठे जिकीरीचे काम आहे. कारणही तसेच आहे. मुख्यत: गाडीचे इन्शुरन्स तीन प्रकारचे असतात.
गाडीचा इन्शुरन्स काढणे म्हणजे एक मोठे जिकीरीचे काम आहे. कारणही तसेच आहे. मुख्यत: गाडीचे इन्शुरन्स तीन प्रकारचे असतात. यामध्ये काही शे ते हजार रुपयांचा फरक असतो. मात्र, अपघातानंतर या काही पैशांची खरी किंमत कळते. तोपर्यंत वेळ झालेला असतो. यामुळे हे प्रकार नेमके काय आहेत, हे इन्शुरन्स काढण्यापूर्वीच जाणून घेतलेले फायद्याचे ठरेल.
भारतीय रस्त्यांची अवस्था पाहता अपघाताचे प्रमाण मोठे आहे. खराब रस्त्यांवरही लक्झरी कार चालताना आपल्याला दिसतात. प्रत्येकाच्या घरात एकतरी दुचाकी असतेच. दुर्दैवाने एखाद्या अपघातास सामोरे जावे लागल्यास हेच इन्शुरन्स कामाला येते. अपघातामध्ये वाहनचालकासह त्याच्या सोबत असलेल्या प्रवाशांनाही दुखापत होते. तसेच समोरच्यालाही दुखापत आणि गाड्यांचेही नुकसान होते. यावेळी उपचारांचा खर्च आणि गाड्यांच्या दुरुस्तीचा खर्च मोठा असतो. तो या इन्शुरन्समधून करता येतो. मात्र, यासाठी इन्शुरन्स कोणत्या प्रकारचा आहे यावर नुकसानभरपाई ठरते. चला पाहूया.
थर्ड पार्टी इन्शुरन्स
मोटार वाहन कायद्यानुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स कायदेशीर आहे. नावावरूनच स्पष्ट होते. हा विमा तिसऱ्या पक्षाशी संबंधीत आहे. पहिला पक्ष म्हणजे विमा विकत घेणारा, दुसरा पक्ष विमा कंपनी आणि तिसरा म्हणजे आपल्यामुळे ज्याच्या गाडीचे नुकसान झाले आहे असा व्यक्ती. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये या तिसऱ्या व्यक्तीलाच नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते. यामध्ये विमा घेणाऱ्या व्यक्तीला काहीही नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच तिसऱ्या पक्षाचा मृत्यू किंवा गंभार दुखापत झाल्यास त्याला भरपाई देण्याचीही कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.
कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्स
या प्रकारच्या इन्शुरन्समध्ये वाहनाला अपघात झाल्यास विमा घेणाऱ्या व्यक्तीसह तिरऱ्या पक्षाचे नुकसानही कव्हर होते. जर समोरचा व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास त्याचाही खर्च केला जातो. तसेच वाहनाचेही नुकसान मिळते. या विमा प्रकारामध्ये अपघात, आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादामध्ये वाहनाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते. या प्रकारामध्ये वाहनाचे नुकसान प्लॅस्टिक, पत्रा याच्या वर्गीकरनानुसार दिले जाते. तसेच डेप्रिसिएशन वाहनाला झालेल्या वर्षानुसार ठरते.
झिरो डेप्रिसिएशन इन्शुरन्स
या प्रकारच्या विमा पॉलिसी अंतर्गत वाहनाच्या नुकसानीची किंमत ठरविताना डेप्रिसिएशन म्हणजेच रक्कम कमी केली जात नाही. म्हणजेच अपघात झाल्यास विमा कंपनी नुकसानीची पूर्ण रक्कम वाहन मालकाला देते. मात्र, या प्रकारच्या इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्सपेक्षा 20 टक्क्यांपेक्षा महाग असतो.