तुम्हाला 'ही' सवय आहे? मग गाडी चालवताना सावधान! अपघात होण्याचा मोठा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 05:22 AM2021-08-13T05:22:01+5:302021-08-13T05:23:31+5:30
अमेरिकेमध्ये कमर्शिअल वाहनचालकांना परवाना देण्याअगोदर आणि दर दोन वर्षानंतर घोरण्याची/झोपाळूपणाची चाचणी दिली जाते. आपल्या देशात जर अशी काळजी घेतली तर अनेक अपघात निश्चितच टळतील.
- डॉ. अभिजित देशपांडे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस (iissreports@gmail.com)
घनश्याम सरोदे यांचे घोरणे आणि कामातली मरगळ एकदमच वाढल्याच्या कहाणीची सुरुवात गेल्या आठवड्यात आपण वाचली. घोरण्यामुळे झोप खंडित होते, त्याने थकवा येतो, मग ‘आज करेसो कल, कल करेसो परसो!’ अशा तऱ्हेची टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती (प्रोकॅन्सटीनेशन) निर्माण होते. पटकन राग येतो. दिवसा झोप येत असल्याने फोकस ठेवणे कठीण जाते, स्मरणशक्ती कमी होते, अगदी औदासीन्यदेखील येऊ शकते. श्री. सरोदे यांचे तेच झाले होते!
वारंवार मेंदू जेव्हा उठवतो त्या वेळेस कॉर्टिसॉल नामक हार्मोनचा स्त्राव होतो. त्यामुळे पोटाभोवतीच्या चरबीचे प्रमाण वाढते. या शिवाय घेलीन या हार्मोनमुळे पिष्टमय पदार्थांची (भात, बटाटा, साखर इत्यादी) आवड निर्माण होते. परिणामी असे पदार्थ जास्त सेवनात येतात. सततच्या थकव्याने व्यायामाचे प्रमाण कमी होते. वाढलेल्या वजनामुळे गळ्याभोवतीची चरबी वाढते. गळ्याचा व्यास (डायामीटर) जितका कमी तितका तो कंप पावण्याची (घोरण्याची )आणि बंद होण्याची शक्यता जास्त!
खंडित झोपेमुळे मेंदूच्या कार्यप्रवणतेवर परिणाम होतो. आपल्या मेंदूचा निर्णय घेण्याचा वेग आणि प्रतिक्षिप्त (रिफ्लेक्स) क्रिया किती पटकन होते हे मोजण्याचे तंत्रज्ञान इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेसमध्ये उपलब्ध आहे.
सरोदे यांची प्रतिक्षिप्त क्रिया (रिफ्लेक्स )जवळ जवळ ५० मिलिसेकंदानी (१००० मिलिसेकंद = १ सेकंद) मंदावली होती. ०.०५ सेकंद हा ‘जीवन की मृत्यू?’ इतका फरक असू शकतो. गाडी ड्राइव्ह करत असताना वाहनचालकाचा रिफ्लेक्स ३० मिलीसेकंदाने चुकला तरी अपघात होऊ शकतो. अमेरिकेमध्ये झालेल्या संशोधनात दारू खालोखाल झोपाळूपणा हे अपघाताचे प्रमुख कारण आहे हे सिद्ध झाले आहे. झोप कुठल्याही कारणाने कमी किंवा खंडित होते तेव्हा गॅम्बलिंग (जुगार) करायची प्रवृत्ती वाढते. ही प्रवृत्ती मोजण्याची पद्धतीही आमच्या संस्थेत आहे. अमेरिकेमध्ये कमर्शिअल वाहनचालकांना परवाना देण्याअगोदर आणि दर दोन वर्षानंतर घोरण्याची/झोपाळूपणाची चाचणी दिली जाते. आपल्या देशात जर अशी काळजी घेतली तर अनेक अपघात निश्चितच टळतील.