पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावर स्कूटर- बाईक चालवताना हवी आत्यंतिक दक्षता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 11:42 AM2017-08-23T11:42:39+5:302017-08-23T11:46:42+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते तयार करताना पेव्हरब्लॉक्सचा वापर झाल्याने रस्त्याच्या कामामध्ये कदाचित गती आली असेल वा पैसे कमी खर्चही झाले असतील पण त्यामुळे स्कूटर व मोटारसायकलींना मात्र चांगलाच धक्का बसत आहे.

be careful while driving on paver blocks road | पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावर स्कूटर- बाईक चालवताना हवी आत्यंतिक दक्षता

पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावर स्कूटर- बाईक चालवताना हवी आत्यंतिक दक्षता

Next
ठळक मुद्देटर्स, मोटारसायकली व सायकलींप्रमाणेच लोकांना चालण्यासाठीही हे पेव्हरब्लॉक्स धोकादायक ठरले आहेत.खड्डा काहीवेळा डांबरी खडीने भरल्यानंतरही त्या ठिकाणी समतलपणा नाहीसा झालेला असल्याने अधिकच त्रासाचा बनतो.

गेल्या काही वर्षांमध्ये विशेष करून शहरांत डांबरी रोड वा सिमेंटचे रस्ते तयार करण्याऐवजी अनेक ठिकाणी सिमेटच्या पेव्हर ब्लॉक्सचा वापर करून रस्ते तयार करण्यात आले, मात्र त्याचे काम करताना अनेक त्रुटी राहून गेल्याने आणि योग्य पद्धतीने व वाहतुकीचा अंदाज घेऊन ते न बसवल्याने पेव्हर ब्लॉकचे हे रस्ते अपघातांची ठिकाणेच बनलेली आहेत. विशेष करून स्कूटर्स, मोटारसायकली व सायकलींप्रमाणेच लोकांना चालण्यासाठीही हे पेव्हरब्लॉक्स धोकादायक ठरले आहेत. त्या बाबत महापालिका, सावर्जनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए यांच्याकडून फारशी दखल घेतलेली नसली तरी त्यांच्या धोक्याबाबत स्कूटर्स व मोटारसायल स्वारांनी तरी दक्षता बाळगायला हवी अशी परिस्थिती नाईलाजास्तव स्वीकारावी लागली आहे. या पेव्हर ब्लॉक्समुळे केवळ अपघातांनाच पाचारण केले गेले आहे असे नव्हे तर दुचाकींच्या सस्पेंशन्सचे, बॉडीचे, चालकांच्या शरीराचेही मोठे नुकसान होत आहे. पेव्हर ब्लॉक कसे बसवावेत, का बसवावेत, ते योग्य की अयोग्य हा येथे मुद्दा नाही, तर ज्या पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांवरून रोज जाणे-येणे होत असते तेथे दुचाकी चालवताना काय दक्षता घ्यावी, हा मुद्दा येथे मांडत आहे.
सर्वसाधारणपणे एकातएक खाचांमध्ये बसवलेल्या या पेव्हरब्लॉक्सच्या रस्त्यांना सुरुवातीला एक काही प्रमाणात समतलपणा असतो. मात्र नंतर ते पेव्हरब्लॉक्स खचू लागतात, काही पेव्हरब्लॉक्स अवजड वाहनांच्या वा सर्वसाधारण वाहतुकीच्या भाराने तुटतात व तेथे खड्डे पडतात. पेव्हरब्लॉक्सची रचना हलू लागते, त्यामध्ये गॅपही पडत जाते.यामुळे पावसामध्ये तेथे पाणी साचल्यानंतर त्यातील खड्ड्यांचा वा खचलेल्या भागांचा अंदाजही येत नाही, तर पाऊस नसतानाही दुचाकी चालवताना अचानक काही ठिकाणी असलेल्या या स्थितीचा अंदाज न आल्याने दुचाकीचे चाक त्यात आदळले जाते. पावसातही ती स्थिती त्याचप्रमाणे सिमेंट वा डांबरी रस्त्यांच्या जोडाला पेव्हरब्लॉक्सची रचना अतिशय धोकादायी असते. तेथे पॅच मारून चांगल्या रस्त्याला पेव्हरब्लॉक्सचा भाग जोडला जातो. तो उंचवटा, कधी अतिउंचवचा तर कधी कोलगटपणा तयार होऊन दुचाकीच्या वेगाला अडथळा ठरून सस्पेंशनला जोरदार धक्का बसतो, चालक व दुचाकी यांची हाडे व नटबोल्ट खिळखिळे करण्याचे काम मात्र यातून साध्य होते. गटारांवरील सिमेंटच्या चौकटी, त्यातील खड्डे किंवा डांबरी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनाही पेव्हरब्लॉक्सद्वारे भरून काढण्याचा उद्योग सध्या केला गेला असल्याचे अनेक ठिकाणी दिसते. सिमेंट रस्त्याच्या बाजूलाही काही ठिकाणी याच पेव्हरचा वापर केला गेलेला आहे. या सर्वांमुळे दुचाकी वाहनांचे आयुष्यच कमी होत असते व त्यातही दुचाकी स्वारांना अपघात होऊन, ते पडणे, त्यांना बसणाऱ्या धक्क्यामुळे मान, शीर लचकणे, लिगामेंट इन्जरी अशा त्रासांना तोंड द्यावे लागते. असे अपघात वा प्रसंग होतात, त्याची उदाहरणे अनेक सापडतील. सर्वसाधारण डांबरी व सिमेंटच्या रस्त्यावरून जाताना दुचाकीला बसणाऱ्या व्हायब्रेशनपेक्षा जास्त व त्रासदायक व्हायब्रेशन्स पेव्हरब्लॉक्सच्या रस्त्यावरून जाताना बसत असतात. उतार असताना तेथे पेव्हरब्लॉक्स असतील, तर ते अधिक धोकादायक असल्याने पूर्ण अंदाज घेूनच स्कूटर्स व मोटारसायकलीं चालवण्याची गरज आहे. स्कूटर्सची चाके ही मोटरासायकलपेक्षा आकाराने लहान असल्याने पेव्हरब्लॉक्सच्या रस्त्यावरून जाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसामुळे भिजलेल्या पेव्हला शेवाळ्यासारखाही गुळगुळीतपणा निर्माण होतो. त्यामुळे चाक स्कीट होण्याचीही मोठी शक्यता असते. पेव्हरब्लॉक्सचे हे रस्ते जेथे जेथे खराब झाले आहेत, तेथे बसवण्यात आलेल्या पर्यायी पेव्हरमुळे अधिकच उंचवटा तेथे तयार होतो तसेच तो खड्डा काहीवेळा डांबरी खडीने भरल्यानंतरही त्या ठिकाणी समतलपणा नाहीसा झालेला असल्याने अधिकच त्रासाचा बनतो. एकूणच पेव्हरब्लॉक्सचे रस्ते हे दुचाकींसाठी तरी नक्कीच धोक्याचे असल्याने दुचाकी चालवणाऱ्यानाच दक्षता घेणे अधिक गरजेचे आहे. पेव्हरब्लॉक्सची रस्त्यांसाठी केलेली योजना स्कूटर व मोटारसायकल या वाहनांना नक्कीच धोकादायक व अपघातग्रस्त ठरलेली आहे, यात शंका नाही. तेथे होणारा त्रास, छोटी इजा, अदखलपात्र अपघात हा देखील त्रासदायक ठरू शकतो, म्हणूनच पेव्हरब्लॉक्सच्या रस्त्यांवरून जाताना आत्यंतिक दक्षता बाळगणेच गरजेचे बनले आहे.

Web Title: be careful while driving on paver blocks road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.