स्मार्टफोनने व्हा 'स्मार्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 01:49 PM2017-11-24T13:49:54+5:302017-11-24T15:40:15+5:30

स्मार्टफोनद्वारे तुम्हाला तुमच्या कारच्या आवाजावर कारमधील या काही महत्त्वाच्या साधनसामग्रीचा जणू अहवालच मिळणार आहे. स्मार्टफोनच्या नेहमीच्या मायक्रोफोन व अ‍ॅक्सेलोमीटरद्वारे या कारमधील साधनांमधील गुणदोष हेरू शकणार आहे व त्याद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे.

be smart with smartphone | स्मार्टफोनने व्हा 'स्मार्ट'

स्मार्टफोनने व्हा 'स्मार्ट'

Next

दिवसेंदिवस मोबाइल व विशेष करून स्मार्टफोन वापराचे प्रमाण चांगलेच वाढत आहे. मात्र हे स्मार्टफोन वापरणे म्हणजे केवळ ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलणे वा जीपीएसचा वापर करणे, गाणी ऐकणे अशा वैयक्तिक वापर करण्यासाठी मर्यादित आहे. स्मार्टफोन हे इलेक्ट्रॉनिक साधन आहे व त्याचा वापर केवळ इतकाच नव्हे तर अनेकांगानी होऊ शकतो. स्मार्टफोनच्या विविध अ‍ॅपनेही गूगल प्लेवर आपल्या उपस्थितीने लक्ष वेधले आहे. त्यात भरही पडत आहे. मात्र आता स्मार्टफोनचा वापर तुमच्या कारच्या देखभालीसाठी सुयोग्य देखभाल साध्य करण्यासाठी लवकरच सुरू होणार आहे. कारला सर्व्हिसिंग कधी हवे, त्याचा एअर फिल्टर बदलायला हवा का, व्हील बॅलन्सिंग करायची गरज आहे का, टायर्सचा नवा सेट घेण्याची गरज आहे का आदी बाबी या स्मार्टफोन निश्चित करील व तुम्हाला तसे मार्गदर्शनही करील. हे काम करणे म्हणजे हिशोब ठेवणारे नाही. म्हणजे एअर फिल्टर टाकून इतके दिवस झाले आहे, मग त्यानुसार वाजला गजर... हा स्मार्टफोन खरोखरच स्मार्ट होणार आहे. एखाद्या मेकॅनिकप्रमाणे तुम्हाला तो मार्गदर्शन करणार आहे. त्या संबंधातील एक सॉफ्टवेअर दोन वर्षांमध्ये व्यावसायिक स्वरूपात सादरही केले जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात तुमच्या कारचे आरोग्य चांगले कसे राहील यासाठी मार्गदर्शक असे हे सॉफ्टवेअर  मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील संगणक तज्ज्ञांनी विकसित केले आहे. 

आजकालच्या नव्या आधुनिक कारमध्ये सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिकने आपले स्थान बळकट केले आहे. मोठ्या कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्येही अनेकदा तेथील कार मेकॅनिक संगणकाद्वारे अनेक बाबी ठीकठाक करीत असतात. पण तितका मोठा संगणक काही प्रत्येकाकडे गाडीत ठेवता येणार नाही, की तशी सुविधा घरी कोणी बाळगणार नाही. मात्र स्मार्टफोनद्वारे तुम्हाला तुमच्या कारच्या आवाजावर कारमधील या काही महत्त्वाच्या साधनसामग्रीचा जणू अहवालच मिळणार आहे. स्मार्टफोनच्या नेहमीच्या मायक्रोफोन व अ‍ॅक्सेलोमीटरद्वारे या कारमधील साधनांमधील गुणदोष हेरू शकणार आहे व त्याद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. नामांकित संशोधक डॉ. जोशुआ सिएगल यांनी याची चाचणी घेतली, वाहनाच्या डॅशबोर्डवर तो स्मार्टफोन ठेवावा व त्याद्वारे कारच्या आरोग्याचे असे निदान करावे. विशेष म्हणजे कारच्या सर्व्हिसमधील तपशीलानुसार ९० टक्क्यांच्यावर अचूकता यामध्ये होती.

जसे स्मार्टफोनचा वापर करीत तुम्ही विविध तपशील नोंदवू शकता, अ‍ॅक्सेलरोमीटरचा वापर करून ओडोमीटर बंद पडल्यासही तुम्ही तुमच्या कारचा वेग त्या स्मार्टफोनवरून पाहू शकता. जीपीएसद्वारे जायचे ठिकाण, रस्ता, वेळ, वाहतूक किती आहे आदी बाबी पाहू शकता. तसाच स्मार्टफोनचा हा स्मार्ट वापर भविष्यात करता येणार आहे. एअरफिल्टर, व्हीलबॅलन्सिंग आदी बाबींसाठी तुम्हाला निदान करण्यासाठी गॅरेजला जायला लागणार नाही, किंवा कोणी गॅरेजवाला, मेकॅनिक फसवेगिरी करण्याची शक्यताही त्यामुळे उरणार नाही. एकूण सारे कसे स्मार्टटेक असणार आहे भविष्यात!
 

Web Title: be smart with smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.