ही व्यक्ती 5व्या माळ्यावर स्वयंपाकघरात चार्ज करतेय आपली Electric Scooter; जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 06:21 PM2021-09-10T18:21:30+5:302021-09-10T18:26:19+5:30
विश गंती यांना त्यांच्या पार्किंगमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणून ते आपली Ather Electric Scooter पाचव्या माळ्यावर आपल्या स्वयंपाकघरात ती चार्ज करतात.
देशात इलेक्ट्रिक व्हेईकलची विक्री जोरात सुरु आहे परंतु या वाहनांच्या चार्जिंगसाठी मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चार्जिंग स्टेशन आणि आपत्कालीन चार्जींग वॅन असे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु राहत्या ठिकाणी देखील चार्जिंगची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. आता बंगळुरू मधून एक अशीच घटना समोर आली आहे. तिथे एका इलेक्ट्रिक स्कूटर मालकाला अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याची परवानगी न मिळाल्यामुळे जुगाड करून इलेक्ट्रिक स्कुटर चार्ज करावी लागत आहे.
ऑटो ग्रीड इंडियाचे प्रोडक्ट मॅनेजमेन्ट आणि जीएम वाईस प्रेजिडेन्ट विश गंती यांना त्यांच्या पार्किंगमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणून ते आपली Ather Electric Scooter लिफ्टच्या मदतीने पाचव्या माळ्यावर घेऊन जातात आणि आपल्या स्वयंपाकघरात ती चार्ज करतात. अशी माहिती गंती यांनी आपल्या LinkedIn प्रोफाईलवर पोस्ट करून दिली आहे. पोस्टमध्ये त्यांनी असे न करण्याचा सल्ला देखील दिला आहे कारण असे केल्यास विजेचा झटका लागण्याचा धोका देखील आहे.
विश गंती गेले चार महिने आपल्या सोसायटीकडे चार्जिंग स्टेशन उभारण्याची परवानगी मागत आहेत. परंतु भारताची ईव्ही राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये त्यांना ही परवानगी मिळाली नाही. याला विरोध म्हणून त्यांनी लिफ्टमध्ये आपली इलेक्ट्रिक स्कुटर लोड करून पाचव्या माळ्यावर आपल्या घरी चार्ज करण्याचा निर्णय घेतला. तसेच भारतातील ईव्ही चार्जिंगची परिस्थितीचे वास्तव लोकांसमोर ठेवण्यासाठी त्यांनी लिंक्डइनवर ही पोस्ट केल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
पोस्ट सोबत विश गंती यांनी LinkedIn वर एक फोटो देखील जोडला आहे. या फोटोमध्ये त्यांनी त्यांची Ather इलेक्ट्रिक स्कूटर त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पार्क केली आहे आणि किचनमध्ये एका पॉईंटद्वारे स्कुटर चार्ज केली जात आहे. पोस्टमध्ये त्यांनी असे करणे धोकादायक असल्याचे देखील म्हटले आहे. यामुळे आग लागण्याचा आणि विजेचा झटका बसण्याची भीती आहे. त्यांच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे.