Petrol वर चालणाऱ्या स्कूटर्सना असं बदला Electric Scooters मध्ये; कमी खर्चात होणार जास्त फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 06:14 PM2021-08-27T18:14:36+5:302021-08-27T18:15:05+5:30
Electric Vehicle : पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या दरम्यान काही कंपन्या स्कूटरला इलेक्ट्रीक स्कूटर्समध्ये कन्व्हर्ट करण्याचा पर्याय घेऊन आल्या आहेत.
जर तुमच्याकडे कोणतीही जुनी पेट्रोलवर (Petrol) चालणारी स्कूटर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. जगभरात आता अनेक ग्राहक इलेक्ट्रीक वाहनांना (Electric Vehicles) पसंती देत आहेत. भारतातही इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढताना दिसत आहे. दरम्यान, बंगळुरूमधील काही स्टार्टअप कंपन्यांनी जुन्या स्कूटरचे इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रूपांतर करण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यासाठीची येणारा खर्चही कमी आहे.
बंगळुरूमध्ये राईड शेअरिंग सेवा पुरवणाऱ्या बाऊन्स या स्टार्टअप कंपनीनं अशीच एक योजना सुरू केली आहे. कंपनी कोणत्याही जुन्या पेट्रोल इंजिन असलेल्या स्कूटरमध्ये इलेक्ट्रीक मोटर आणि बॅटरी (रेट्रोफिट किट) लावून इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रूपांतरित करते. यासाठी कंपनी फक्त 20 हजार रुपये आकारत आहे.
किती मिळणार रेंज?
“आतापर्यंत आम्ही 1000 हून अधिक जुन्या स्कूटरचं इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रूपांतर केलं आहे. कंपनी या स्कूटर मालकांसाठी सेवा केंद्रे देखील उघडत आहे. या स्कूटरमध्ये येणाऱ्या बॅटरी किटसह, एकदा स्कूटर पूर्ण चार्ज झाल्यावर स्कूटर ६५ किमी पर्यंत चालवता येते. हे किट ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे प्रमाणित आहे," अशी माहिती बाउन्सचे सह-संस्थापक विवेकानंद हलकेरे यांनी दिली.
पेट्रोल, इलेक्ट्रीक दोन्ही पर्याय
बाउन्स या कंपनीनंतर आता अनेक कंपन्या असं किट घेऊन आल्या आहेत, ज्यात Etrio आणि Meladath ऑटोकम्पोनन्ट सामिल आहे. रिपोर्टनुसार Meladath एक असं Ezee Hybrid किट मार्केटमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे ज्याच्या वापरानं जुनी स्कूटर तुम्ही हायब्रिड स्कूटर किंवा इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये बदलू शकता. त्यामुळे गरज भासल्यास तुम्हाला ती इलेक्ट्रीक किंवा पेट्रोल दोन्ही पैकी कोणत्याही एका मोडवर चालवता येते.