24 kmpl पर्यंत मायलेज देणार्या देशातील सर्वात स्वस्त टॉप 3 कार, जाणून घ्या सविस्तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 02:03 PM2023-03-27T14:03:50+5:302023-03-27T14:04:13+5:30
Best mileage cars : जर तुम्ही सर्वात कमी किमतीत मायलेज देणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या अशा टॉप 3 कारचे डिटेल्स, ज्या 4 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील.
नवी दिल्ली : भारतातील मध्यमवर्गीयांमध्ये सर्वोत्कृष्ट मायलेज असलेल्या कारची मागणी सर्वाधिक आहे. त्यामुळे या 5 सीटर हॅचबॅक कार कमी किमतीत अधिक मायलेज घेऊन येतात. जर तुम्ही सर्वात कमी किमतीत मायलेज देणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या अशा टॉप 3 कारचे डिटेल्स, ज्या 4 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील.
Top 3 Best Mileage Cars
Maruti Alto 800
मारुती अल्टो 800 ही देशातील सर्वात कमी किमतीची कार आहे, जी कमी किंमतीव्यतिरिक्त साइज आणि मायलेजमुळे मध्यमवर्गीयांमध्ये खूप पसंत केली जाते. अल्टो 800 ची सुरुवातीची किंमत 3.54 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप मॉडेलसाठी 5.13 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारचे चार ट्रिम बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मारुती अल्टो 800 मध्ये, कंपनीने 796 सीसीचे 0.8 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 48 पीएस पॉवर आणि 69 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही कार 22.05 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे.
Datsun Redi-Go
देशातील दुसरी सर्वात कमी किमतीची कार डॅटसन रेडी गो आहे. जी थेट मारुती Alto 800 ला टक्कर देते. दिल्लीमध्ये या कारची एक्स-शोरूम किंमत 3.84 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 4.96 लाख रुपयांपर्यंत जाते. डॅटसन रेडी गोमध्ये 799 सीसीचे 3 सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 53.64 बीएचपी पॉवर आणि 72 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही कार एक लिटर पेट्रोलवर 20.71 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.
Maruti Alto K10
देशातील तिसरी सर्वात स्वस्त कार मारुती अल्टो K10 आहे, जी चार ट्रिमसह बाजारात उपलब्ध आहे. या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.95 लाख रुपयांपर्यंत जाते. या किंमती (एक्स-शोरूम, दिल्ली) आहेत. मारुती अल्टो K10 मध्ये 998 सीसीचे 1 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 67 पीएस कमाल पॉवर आणि 89 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. मारुती अल्टो K10 चे ARAI प्रमाणित मायलेज 24.39 kmpl आहे.