सावधान! पेट्रोल पंपावर कसे फसवतात? कर्मचारी या गोष्टी हेरतात, तुमच्या चुका टाळा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 03:21 PM2024-04-11T15:21:31+5:302024-04-11T15:21:52+5:30
Petrol Pump Fraud: प्रत्येक पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या पद्धतीने ठकविले जाते. यामुळे तुम्ही जेवढे सजग तेवढे कमीच पडणार आहे.
जर तुमच्याकडे दुचाकी, कार आहे तर तुम्हाला पेट्रोल पंपावर जावे लागेल. ज्या लोकांनी ईलेक्ट्रीक वाहने घेतलीत ते पेट्रोल पंप सोडून सर्व्हिस सेंटरची भेट घेत असतील. परंतु, जे लोक पेट्रोल पंपावर जातात ते सर्रास फसले जातात. कारण तेथील कर्मचारी तुमच्या बेसावध पणाचा पुरेपूर फायदा उचलतात आणि लुटायचा प्रयत्न करतात. यात तुमची चुकी की त्यांची याकडे न जाता तुम्ही त्यापासून कसे सावध होता येईल हे पहा...
प्रत्येक पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या पद्धतीने ठकविले जाते. यामुळे तुम्ही जेवढे सजग तेवढे कमीच पडणार आहे. परंतु तुम्ही सर्वात आधी जेव्हा पेट्रोल किंवा डिझेन भराल तेव्हा कारमध्ये बसून किंवा दुचाकीवर बसून गप्पा मारणे बंद करा. तुम्ही गप्पांत गुंग असला तर फसलात म्हणून समजा.
दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही इंधन भरण्यासाठी सांगाल तेव्हा तो कर्मचारी मीटरवर झिरो करतोय का ते पहा. तुमच्या आधी अनेकदा जो भरून जातो तो ५०-१०० रुपयांचे इंधन भरून जातो. तुम्ही त्यापेक्षा जास्तीचे इंधन भरायला गेला की फिलर त्याच्यापुढील मीटर चालू करतो. त्यामुळे तुमचे नुकसान होते.
पेट्रोल पंपावर नेहमी १ लीटर, २ लीटर असे पेट्रोल भरू नका. तसेच १००,२०० चे भरू नका. नेहमी विषम नंबरचा आकडा सांगा व भरा. यामुळे तुम्ही पेट्रोल पंपावरील युनिटमध्ये फ्रॉड करण्यासाठी लावलेल्या चिपपासून वाचू शकाल.
शक्यतो तुम्ही नेहमीच्या किंवा ओळखीच्या पेट्रोल पंपावर इंधन भरा. दुसरीकडे भरण्याची वेळ आली तर सजग रहा आणि मायलेजमध्ये काय फरक पडतो ते देखील पहा. तुम्हाला दुसऱ्या पंपावर जास्त मायलेज मिळत असेल किंवा गाडीमध्ये चांगला फरक पडला असेल तर नेहमीच्या पंपावर काहीतरी गोलमाल आहे हे लक्षात घ्या.
सर्वात महत्वाची म्हणजे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी इंधन भरायला सुरुवात करताना बोलत बसू नका. त्यामुळे तुम्ही गुंतले जाल आणि तो हात साफ करून जाईल. सावध तो सुखी. काही गोलमाल वाटल्यास किंवा घडल्यास तुम्ही पेट्रोल पंपावरील तक्रार वहीमध्ये तक्रार नोंदवू शकता. त्याची दखल कंपनीचा अधिकारी व्हिजिटला आला की घेतो आणि तुम्ही फोन नंबर दिला असेल तर फोनही करतो.