भारत एनकॅपला अखेर मुहूर्त सापडला; या चार कंपन्या पाठविणार कार, मारूती आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 02:58 PM2023-11-02T14:58:24+5:302023-11-02T14:58:55+5:30
भारत एनकॅपमध्ये भारत, जपान आणि दक्षिण कोरियाच्या कंपन्यांच्या कारची सुरुवातीला टेस्टिंग केली जाणार आहे.
ग्लोबल एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळविल्यानंतर आता भारतीय कंपन्या भारत एनकॅपसाठी सज्ज झाल्या आहेत. त्या चाचणीपेक्षा ही चाचणी थोडी कमीच असली तरी देखील सध्याच्या लोकांच्या कलानुसार कंपन्या सुरक्षित कार देण्याकडे वळल्या आहेत. टाटाने देशाला पहिली फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग असलेली कार दिली होती. यामुळे BNCAP मध्ये देखील टाटाचा डंका असणार आहे.
भारत एनकॅप १५ डिसेंबरपासून सुरु होत आहे. भारतात बनलेल्या कारची या ठिकाणी चाचणी केली जाणार आहे. सुरुवातीला चार कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत. य़ामध्ये तीन फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार बनविलेल्या कंपन्या आणि एक शून्य स्टार रेटिंगच्या कार बनविणारी कंपनी असणार आहे.
वयस्कर आणि लहान मुलांच्या सुरक्षेवरून या कारना सुरक्षा रेटिंग दिले जाणार आहे. ग्लोबल एनकॅपमध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा आणि स्कोडा, फोक्सवॅगन आणि ह्युंदाईच्या एका कारला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेले आहे.
भारत एनकॅपमध्ये भारत, जपान आणि दक्षिण कोरियाच्या कंपन्यांच्या कारची सुरुवातीला टेस्टिंग केली जाणार आहे. यामध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि महिंद्रा असणार आहे. या चारही कंपन्या सध्या भारतीय बाजारात टॉपवर आहेत. यापैकी टाटाकडे सर्वाधिक सुरक्षित कार आहेत. तर मारुतीकडे एकही कार सुरक्षित म्हणजेच फाईव्ह स्टार रेटिंगची नाहीय. उलट मारुतीकडे झिरो आणि एक स्टार रेटिंगच्याच कार भरपूर आहेत.
भारतात एनकॅप टेस्टिंग बंधनकारक नाहीय. परंतू, विक्री आणि ग्राहकांच्या विश्वासासाठी कंपन्यांना हे गरजेचे वाटू लागले आहे. दुसरीकडे ग्राहकही जागरुक झाला आहे. १०-१५ लाख रुपये गुंतवायचे आणि आपल्यासोबत कुटुंबाचाही जीव धोक्यात का घालायचा असा विचार आता भारतीय ग्राहक, तरुणाई करू लागली आहे.