दुचाकीची सवारी जपूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:54 PM2017-08-01T16:54:52+5:302017-08-01T16:54:56+5:30

लांबवर व शहराबाहेरच्या मोटारसायकलीचा प्रवास म्हणजे तरुणांचा उत्साही भाग असतो. पण अशी रपेट करताना संयम हाच सक्षम ड्रायव्हिंगचे मुख्य लक्षण असते.

Bike ride racked | दुचाकीची सवारी जपूनच

दुचाकीची सवारी जपूनच

Next

मस्तपैकी लांबच्या प्रवासाचा आनंद घ्यावा, मित्रांच्या बरोबर पिकनिक काढावी शहराबाहेरचा वारा प्यावा, आजूबाजूच्या हिरवाईला डोळेभरून साठवावे, यासाठी मोटारसायकलीवरून मनसोक्त भटकावे, अशी इच्छा अनेक तरुणांच्या मनात असते.गणपती आले की अनेकांना आपल्या मोटारसायकलवर किंवा स्कूटरवर स्वार होऊन कोकणात किंवा आपल्या गावाला जावेसे वाटते. शहरी वाहतुकीपासून दूर रपेट करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी घरच्यांचा विरोध डावलून वा सेफ चालवीन, काळजी नको असे आश्वासन देऊन या गावाकडच्या टूरला जाणारे तरुण आजही कमी नाहीत, उलट वाढले आहेत. काही वर्षांपूर्वी हाताने गीयर टाकायच्या १५० सी सीच्या स्कूटर्सही होत्या. त्या स्कूटर्सची ताकद व रफटफपणा आजच्या स्कूटर्समध्ये नाही ही वस्तुस्थिती आहे. पण लांब प्रवासाला जाता येईल अशा मोटारसायकलींना तोटा नाही. काही असले तरी तरुणाईचा जोश व रग आजही कायम आहे.

अशी ही रफटफ बाईक प्रवासाची हौस अनुभवताना कमालीची दक्षता घ्यावी लागते. एकंदर वाहनांचा वेग वाढला असला तरी रस्ते काही सर्वत्र छान झाले आहेत असे अजिबात नाही.मोटारसायकलवरून जाताना अनेक प्रकारची चिंता असते ती मनात ठेवूनच तयारीने जावे हे महत्त्वाचे. तसेच गतीवर नियंत्रण, सावधपणे ओव्हरटेकींग, दक्ष ड्रायव्हिंग,मोटारसायकलीची उत्तमप्रकारे निगा राखूनच अशा टूरवर जावे. हेल्मेट शक्यतो पूर्ण असावे,हाफ हेल्मेट वापरू नये. त्यामुळे वारा, धूळ- माती यापासून चांगले संरक्षण मिळते. चष्मा असला तर गॉगल ग्लास हेल्मेटला लावली असेल तर ती गडद असू नये. शक्यतो तशी हेल्मेट्स ही गॉगल ग्लासपेक्षा साध्या पारदर्शक पांढऱ्या रंगाची असावी. त्यापेक्षा गॉगल असेल तर चांगले. मोटारसायकल पूर्ण नीट सर्व्हिस करून, ब्रेक, हेडलँप, ब्रेकलाईट, साईड इंडिकेटर हे व्यवस्थित आहेत की नाही ते पाहाणे. शक्यतो रात्रीचा प्रवास नकोच, हे ध्यानात घेऊन प्रवासाला निघावे. म्हणजे रात्री पोहोचणार असाल तर सायंकाळी कुठे तरी मुक्काम करावा. लांबच्या प्रवासात आपली कपॅसिटी अजमावू नये. टायरमधील हवा मधे मधेही चेक करावी. रस्त्याला दुभाजक असोत की नसोत, हेडलँप चालू ठेवलेला उत्तम असतो,सकाळच्यावेळीही तो सिग्नल म्हणून महत्त्वाचा आहे.

प्रत्यक्ष रस्त्यावर लांबच्या प्रवासात मोटारसायकल चालवणे व शहरात नेहमीच्या रस्त्यावर चालवणे यात फरक आहे. यासाठी वेगावर नियंत्रण, गीयरवर नियंत्रण व ब्रेक्सचा संतुलीत वापर गरजेचा आहे. वळणे, खड्डे, गतिअवरोधक याचबरोबर ग्रामीण भागातील वाहतुकीची स्थिती याचा पूर्ण अंदाज घेत ड्रायव्हिंग करावे. आपल्याबरोबर अति सामान घेऊ नये.आपल्याला आपण जपावे व दुसऱ्याच्याही कारण ग्रामीण भागात गायी, म्हशी, बैल, कुत्रे,गाढवे, डुक्कर असे प्राणी रस्त्यात कसे फिरतील याचा नेम नसतो. तसेच तेथी माणसे ही देखील त्यांच्या पद्धतीने वावरत असतात. गावातून जाताना आपले वर्तन विशेष करून वाहनचालन हे अतिशय दक्ष, सावध व सुरक्षित ठेवावे. सुरक्षित वाहनचालन व प्रवास हेच सर्वात महत्त्वाचे आहे. तरुणांमध्ये असणारा उत्साह हा कितीही असला तरी अशा प्रवासामध्ये संयम हेच मोठे सक्षमतेचे लक्षण असते.

Web Title: Bike ride racked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.