रॉयल एनफिल्डला टक्कर देणार बीएसए बाईक, महायुद्धात सैनिकांची होती पसंत!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 04:55 PM2023-04-10T16:55:30+5:302023-04-10T17:24:21+5:30
युद्ध संपले पण बीएसए बाईकने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.
नवी दिल्ली : एकेकाळी बीएसएच्या बाईक्स जगभर प्रसिद्ध होत्या. हँड गियर आणि लॅम्प लाइटसह येणारी बीएसए बाईक ही महायुद्धात सैनिकांची पहिली पसंती होती. कारण या बाईक हलक्या होत्या आणि रात्रीच्या अंधारातही त्या सहज चालवता येत होत्या. या बाईकचे पिकअप आणि मायलेजही तेव्हा बऱ्यापैकी होते. बाईकच्या मदतीने कोणत्याही ठिकाणी वेळेत पोहोचता येत होते. बाईकवरून आलेल्या सैनिकांच्या तुकड्या शत्रूच्या प्रदेशात अचानक हल्ला करून तिथून झटपट निघून जात होत्या.
युद्ध संपले पण बीएसए बाईकने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. बहुतेक बीएसए बाईक्स ब्रिटीश अधिकाऱ्यांनी भारतात आणल्या आणि नंतर या बाईक्स इथेच राहिल्या. दरम्यान, लोकांनी नंतर बाईक इंपोर्ट केल्या, परंतु त्यांची संख्या खूपच कमी होती. आता पुन्हा एकदा बीएसए भारतात प्रवेश करण्याच्या विचारात आहे आणि कंपनी आपली एंट्री लेव्हल बाईक देशात लाँच करण्याच्या तयारीत आहे. या बाईकची थेट स्पर्धा रॉयल एनफिल्डच्या बाईकशी होणार आहे.
Gold Star पासून सुरुवात
कंपनी आपली पहिली बाईक गोल्ड स्टार भारतात लाँच करू शकते. बाईक 650 सीसी सेगमेंटची पूर्तता करेल. बाईकची स्पर्धा रॉयल एनफिल्डच्या कॉन्टिनेंटल जीटी आणि सुपर मेटिअरशी होईल. बाईकमध्ये सिंगल सिलिंडर फोर व्हॉल्व्ह इंजिनद्वारे चालविली जाईल, जी 44 Bhp पॉवर जनरेट करेल. बाईकचे कर्ब वजन जवळपास 213 किलो असेल, ज्यामुळे रोड ग्रिप चांगली देईल. कंपनी बाईकमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्सही देणार आहे. यात ABS, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टेलिस्कोपिक फोर्क्स मिळतील.
कधी होईल लाँच?
दरम्यान, कंपनीने अद्याप मोटरसायकल लाँच संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोल्ड स्टार यावर्षी भारतात एन्ट्री करू शकते. बाईकची किंमत देखील उघड करण्यात आलेली नाही. परंतु ही बाईक 3.50 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली जाईल, असे म्हटले जात आहे.